आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीस वर्षे जुना जलकुंभ, स्ट्रक्चरल ऑडिटच्या दिल्या सूचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अणदूर : येथील सार्वजनिक नळ योजनेच्या जलकुंभाची दुरवस्था झाली असून स्ट्रक्चरल ऑडिट करून तो धोकादायक नसल्याची खात्री करून घ्यावी, अशी लेखी सूचना जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, तुळजापूरने येथील ग्रामपंचायतला दिली आहे.
अणदूर येथे १९८० मध्ये सार्वजनिक पाणीपुरवठा योजना सुरू झाली, त्या वेळी उभारण्यात आलेल्या जलकुंभास ३६ वर्षे पूर्ण झाली आहेत. नादुरुस्त अवस्थेत पाणीपुरवठा सुरू आहे. तेव्हाच्या लोकसंख्येनुसार बांधलेल्या या टाकीची क्षमता २ लाख ५० हजार लिटर आहे. यातूनच संपूर्ण गावास पाणीपुरवठा करण्यात येत होता. मागील १० वर्षांत काही भागात स्वतंत्र टाक्या बांधण्यात आल्या. परंतु आजही गावास याच जलकुंभातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
चर्चा व पाहणी : अणदूर ग्रामपंचायतने २५ ऑक्टोबरच्या मासिक बैठकीत या दुरवस्था झालेल्या जलकुंभाबाबत चर्चा करून पाणीपुरवठा सभापती डॉ. जितेंद्र कानडे यांच्यासोबत पाहणी केली. या वेळी गॅलरी व रुफस्लॅबचे स्टील उघडे पडले असून अनेक ठिकाणी काँक्रीट गळून पडल्याचे निदर्शनास आले. याबबतची वस्तुस्थिती व गांभीर्य अणदूर ग्रामपंचायतने संबंधित वरिष्ठ कार्यालयास कळवली होती.
ग्रामपंचायतच्या याच पत्रावरून जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, तुळजापूर यांनी ग्रांमपंचायत स्तरावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत टाकीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल घ्यावा, असे कळवले होते.
तसेच नागपूर येथील स्ट्रक्चरल इंजिनिअर यांच्याकडून जलकुंभ वापरण्यास योग्य आहे काय, याबाबतचा अहवाल ताबडतोब घ्यावा, असेही निर्देश दिले होते. या जलकुंभापासून दुर्घटना घडून वित्तीय-जीवित हानी झाल्यास त्यास सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदार राहील, असा इशारा लेखी पत्राद्वारे ग्रामपंचायतला देण्यात आला आहे.

लवकरच कार्यवाही
-पाणीपुरवठा विभागाने पत्रामध्ये धोक्याची भीती व्यक्त केली आहे. अनेक दिवसांपासून ग्रामसेवकांचा संप असल्याने पाठपुरावा झाला नाही. लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवालानंतर कार्यवाही करण्यात येईल.
डॉ. जितेंद्र कानडे, सभापती

बातम्या आणखी आहेत...