आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोट्या गुन्ह्याची धमकी देऊन खंडणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन सेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्याला दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेला २० हजार रुपये घेताना शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडून गजाआड केले. ही कारवाई बुधवारी दुपारी जिल्हा न्यायालयाच्या आवारात केली.

उस्मानाबाद शहरातील पोष्ट कॉलनी येथे राहणारे सेवानिवृत्त कृषी अधिकारी भारत काळे (६०) यांना गेल्या काही दिवसांपासून छाया रामा झेंडे (४५, रा. सांजा रोड, उस्मानाबाद) या महिलेकडून बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकाविण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले जात होते. बदनामीच्या भीतीपोटी काळे यांनी यापूर्वी त्या महिलेला १० हजार रुपये दिले आहेत. यामुळे पैशाची चटक लागलेल्या छाया झेंडे हिने पुन्हा त्या अधिकाऱ्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागून, पैसे नाही दिल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे काळे यांनी शहर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यानुसार, शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र बनसोडे, महिला सहायक पोलिस निरीक्षक सानप व डीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास न्यायालयाच्या आवारात सापळा रचला. आरोपी महिलेने तक्रारदार भारत काळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर पैशाची विचारणा केली. यावेळी काळे यांनी पैसे आणल्याचे सांगितल्यानंतर न्यायालयाच्या आवारात पैसे घेऊन बोलावले. तेथे तक्रारदार काळे व आरोपी महिला झेंडे यांची भेट होऊन काळे यांनी खंडणीपोटी मागितलेल्या दोन लाख रुपयांपैकी २० हजारांची रक्कम झेंडे या महिलेकडे सोपविल्यानंतर परिसरात असलेल्या पोलिसांनी तत्काळ कारवाई करून महिलेला पैशासह ताब्यात घेऊन गजाआड केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात भादंवि ३८८ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.