आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारेवरील कपडे काढताना विजेचा शाॅक, मुलाला वाचवताना वडिलांसह दाेघा भावांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड तालुक्यातील बाळापूर येथील माजी सरपंच बाबासाहेब सुरवसे यांच्या घरासमोरील हीच ती कपडे वाळत घालण्याची तार. घटनेनंतर या तारेतील वीज प्रवाह बंद करण्यात आला. - Divya Marathi
बीड तालुक्यातील बाळापूर येथील माजी सरपंच बाबासाहेब सुरवसे यांच्या घरासमोरील हीच ती कपडे वाळत घालण्याची तार. घटनेनंतर या तारेतील वीज प्रवाह बंद करण्यात आला.
नेकनूर - पाऊस आल्याने अंगणातील तारेवर वाळत टाकलेले कपडे काढत असताना मुलास विजेचा धक्का बसल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पित्यासह भावाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री एक वाजता बीड तालुक्यातील बाळापूर येथे घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

बाळापूर येथे शुक्रवारी रात्री उकाडा जाणवत असल्याने गावातील माजी सरपंच असलेले बाबासाहेब नानासाहेब सुरवसे (७५) हे घराच्या बाहेर अंगणात झोपले होते. पहाटे एक वाजता अचानक पावसाला सुरुवात झाली. तेव्हा त्यांचा मुलगा अशोक बाबासाहेब सुरवसे (४०) हे घराबाहेर आले. त्यानी अंगणातील धुणे वाळत टाकण्याच्या तारेवरील कपडे काढण्यास सुरुवात केली. तारेत वीजप्रवाह उतरल्याने कपडे काढताना अशोक सुरवसे यांना विजेचा धक्का बसला. हे पाहिल्यानंतर अंगणात झोपलेले वडील बाबासाहेब सुरवसे अशोकच्या मदतीला धावले तेव्हा त्यांनाही विजेचा धक्का बसला. वडील आणि भाऊ विजेच्या तारेला चिकटले असल्याचे पाहून दुसरा भाऊ सुभाष बाबासाहेब सुरवसे (३४) हा दोघांच्या मदतीला धावला. तेव्हा विजेच्या धक्क्यामुळे तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन नेकनूर येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले. दुपारी १२ वाजता बाळापूर येथे पित्यासह दोन मुलांना एकाच चितेवर अग्निडाग देण्यात आला.

सुभाष ग्रामपंचायत सदस्य, अशोक होता मिस्त्री
बाळापूर गावातील घटनेत मृत्यू झालेल्या सुभाष सुरवसे याला पत्नी, दोन मुले तर अशोकला पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. यातील सुभाष हा ग्रामपंचायत सदस्य असून वडिलांच्या नावे असलेले स्वस्त धान्य दुकान चालवायचा तर अशोक गावात मिस्त्री काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होता. सुरवसे कुटुंबाला वडिलोपार्जित जमीन नाही. सिलींग अॅक्टनुसार या कुटुंबाला गावात तीन एकर कोरडवाहू जमीन मिळाली होती, परंतु दुष्काळामुळे त्यात काही पिकत नव्हते.

झाडाला बांधलेल्या तारेत उतरला प्रवाह
बाळापूर येथील माजी सरपंच बाबासाहेब सुरवसे यांच्या घरी घेण्यात आलेल्या वीज जोडणीच्या वायरबरोबरची तार एका झाडाला बांधून ती घराच्या भिंतीमधील खुंटीला बांधण्यात आली. त्याच खुंटीला घरातील कपडे वाळत टाकण्याची तार बांधली होती. शुक्रवारी रात्री एक वाजता वादळी वाऱ्यात झाडाला बांधण्यात आलेली तार विजेच्या घरासमोरील पोलवरून गेलेल्या मुख्य वाहिनीला चिकटल्याने धुणे वाळत घालण्याच्या तारेत वीज प्रवाह उतरला. तेव्हा तारेवरील कपडे काढून घेताना एका पाठीमागे एक असे करून पित्यासह दोन मुले असा तिघांचा मृत्यू झाला.
पुढे वाचा...
> यांनी दिला अग्नी
>शोकाकुल झाले बाळापूर
>इलेक्ट्रिकल अॅक्सिडेंट
बातम्या आणखी आहेत...