आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन मुलींसह वडिलांचा तलावात संशयास्पद मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- तालुक्यातील जोडतळा येथे गायरान जमिनीवर शेती करून उपजीविका करणार्‍या पारधी समाजातील तीन मुलींसह त्यांच्या वडिलांचा हिरडी येथील तलावात बुडून मृत्यू झाला. गायरान जमिनीवरून याच कुटुंबाला यापूर्वीही अनेक वेळा लक्ष्य करण्यात आले असल्याने प्रकरणात घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तालुक्यातील भिरडा येथील मूळचे रहिवासी असलेले सुंदरसिंग सखाराम पवार हे पत्नी आणि चार मुलींसह जोडतळा शिवारात गायरान जमीन ताब्यात घेऊन त्यावर शेती करत होते. बासंबा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुंदरसिंग यांच्या मंदाकिनी (18), पूजा (16), पूनम (14) व सोनूल (10) या मुली हिरडी येथील तलावावर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोहण्यासाठी गेल्या होत्या. सोनूल लहान असल्याने ती तलावाच्या काठावर उभी राहिली, तर इतर बहिणींनी पाण्यात उड्या मारल्या. सुमारे पाऊण तास झाला तरी त्या वर आल्या नसल्याने सोनूल घराकडे गेली आणि वडील सुंदरसिंग यांना बहिणींबाबत माहिती दिली. त्यानंतर तलावावर गेलेल्या सुंदरसिंग यांनी मुलींच्या शोधासाठी पाण्यात उडी मारली; परंतु तेही पाण्यात बुडाले ते पुन्हा वर आलेच नाहीत. त्यानंतर सुंदरसिंग यांची पत्नी मंगलाबाई या तलावावर पोहोचल्यावर त्यांना सर्व जण बुडाल्याचे दिसून आले. त्यांनी बासंबा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शोधमोहीम हाती घेतली. त्यामध्ये एका मुलीचा मृतदेह हाती आला असून उर्वरित मृतदेह रात्री पाऊणेनऊ वाजेपर्यंत हाती लागले नव्हते.

दरम्यान, सुंदरसिंग यांनी गायरान शेती ताब्यात घेतल्याने दोन वर्षांपूर्वी त्यांची झोपडी जाळून टाकण्यात आली होती. याशिवाय सहा महिन्यांपूर्वीच त्यांची पत्नी मंगलाबार्इंना बेदम मारहाण करण्यात आली होती. तसेच त्यांच्या मुलींनाही त्रास देण्यात आला होता. हे सर्व गुन्हे बासंबा पोलिसांत दाखल आहेत. विशेष बाब म्हणजे पवार कुटुंबीय हिरडीच्या तलावावर नेहमीच जात होते. सुंदरसिंग आणि त्यांच्या मुलींना पोहता येत होते, असे असतानाही पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू कसा काय झाला, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून घातपाताची शक्यताही वर्तवली जात आहे; परंतु यावर काही भाष्य करण्यास पोलिस तयार नाहीत.