आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव ट्रकच्या धडकेत बीडचे तीन तरुण ठार, मांजरसुंब्याजवळील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - बीडहून साखरेबोरगावकडे निघालेल्या दुचाकीवरील तीन तरुणांना मागून भरधाव येणा-या मद्यपी ट्रकचालकाने चिरडल्याची घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंबा येथील कन्हैया ढाब्याजवळ मंगळवारी दुपारी दीड वाजता घडली. अपघातातील तीनही मृत तरुणांची नावे रवी भगवान माळवदे (२१), सचिन भारत देवतरासे (२१), महेश बबन चव्हाण (१९, सर्व रा. लक्ष्मणनगर, बीड) अशी आहेत.

रवी माळवदे, सचिन देवतरासे, महेश चव्हाण हे तिघे दुपारी दुचाकीने (एम.एच.२५ जे- ४४०८) बीड तालुक्यातील साखरेबोरगाव येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी मांजरसुंबामार्गे निघाले होते. दुचाकी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंबा गावाजवळील कन्हैया ढाब्याजवळ आली असता बीडहून सोलापूरकडे भरधाव निघालेल्या ट्रकने (एम.एच.०९ एल.७३४४) दुचाकीला मागून जोराची धडक देत चिरडले. यात तिघेही जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रकचालक चौसाळा गावच्या दिशेने फरार झाला. या अपघाताची माहिती मिळताच मांजरसुंबा महामार्ग विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक निवृत्ती एखंडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक शेख नसीर, नेकनूर ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आर.बी. पाटील, वाय. बी. खटके, जमादार संजय फड यांनी घटनास्थळी भेट देऊन महामार्गावर पडलेले तरुणांचे मृतदेह ताब्यात घेऊन नेकनूर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.

मद्यपी कंटेनरचालक अटकेत
दुचाकीवरील तीन तरुणांना चिरडून मांजरसुंब्याहून चौसाळ्याकडे फरार झालेल्या ट्रक चालकाने एवढ्या वेगात ट्रक पळवला की, चौसाळ्याजवळील पेट्रोल पंपाजवळ इंजिन गरम होऊन ट्रक बंद पडला. पाठलागावरील महामार्ग पोलिसांनी मद्दपी ट्रकचालक शरद सुदाम गाताडे याला अटक केली आहे.