आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात तीन अपघातांत एक ठार, वीस जण जखमी, गेवराई, वडवणी, केजमध्ये अपघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- कंदुरी कार्यक्रमासाठी पाहुण्यांना घेऊन जाणारी पिकअप गेवराई तालुक्यातील खेर्डावाडीजवळ ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटल्याने उलटली. त्यात एक ठार, तर १५ जण जखमी झाले. केज तालुक्यातील जोला गावातून प्रवाशांना घेऊन आठवडी बाजारासाठी निघालेली टमटम (अॅपेरिक्षा) केज-बीड मार्गावर विजेच्या पोलवर धडकून उलटली. यात दोघे जखमी झाले. तिसरा अपघात वडवणी तालुक्यात देवळा घाटात घडला. या घाटात बीड-टोकवाडी बस उतरताना ब्रेक निकामी झाले. चालकाने सतर्कता दाखवत बस घाटाच्या कठड्यावर घातल्याने प्रवाशांचे प्राण वाचले. तिन्ही अपघात मंगळवारी दिवसभरात घडले आहेत. 

वडवणी तालुक्यातील देवळा घाटात मंगळवारी सकाळी ११ वाजता बीडहून टोकवाडीकडे निघालेल्या बसला अपघात झाला. या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला. सकाळी ११ वाजता बीड-टोकवाडी बस (एमएच २०-०६०४) देवळा घाट उतरताना ब्रेक निकामी झाले. गाडी एका वळणावर येताच चालकाने सावधगिरी बाळगत बस घाटाच्या कठड्यावर घातली. यामुळे गाडीतील तीन प्रवाशांना किरकोळ मार लागला. या प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 
खेर्डावाडीजवळ उलटला पिकअप 
अपघाताची दुसरी घटना गेवराई तालुक्यातील खेर्डावाडीजवळ घडली. खेर्डा बुद्रुक येथील बाबा विष्णू कादे यांच्या वतीने माजलगाव तालुक्यातील एकदरा येथे मंगळवारी कंदुरीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी १६ ग्रामस्थ नातलगांना घेऊन पिकअप (एमएच १२ एयू ८५ ८४) माजलगावकडे निघाला होता. वाटेत काही अंतरावर चालकाचा पिकअपवरील ताबा सुटल्याने पिकअप उलटली. यात रामराव सुखदेव काळे (रा.वाहेगाव, ता.गेवराई) हे जागीच ठार झाले. सुभाष कादे, दीनानाथ म्हेत्रे, विलास कादे, ललिता कादे, पंचकुला कादे, रितुजा कादे (सर्व रा.खेर्डा) असे पंधरा जण जखमी झाले आहेत. जखमींवर सिरसदेवी नाथापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

तिसरी घटना केज तालुक्यात घडली. जोला येथील टमटम ( एमएच २३ एन ५१५ ) काही प्रवासी कांद्याची पोती भरून मंगळवारी सकाळी आठवडी बाजारासाठी केजकडे येत होती. केज शहरापासून जवळच असलेल्या आदर्श कॉलनीजवळ दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करून पुढे निघण्याच्या प्रयत्नात टमटमचालकाचा ताबा सुटला. त्यामुळे टमटम रस्त्याच्या कडेला विजेच्या पोलला जाऊन धडकून उलटली. या अपघातात राजेंद्र मुंडे (१७, रा. मुंडेवाडी), महादेव बांगर (६५, रा. जोला) हे दोघे जखमी झाले. या जखमींवर अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. 

तारा हटवल्या 
आदर्शकॉलनीजवळ टमटम विजेचा पोल मोडून उलटल्याने पोलवरील तारा रोडवर पडल्या. त्या तारा वाहनाच्या बाजूला पडल्याने जवळ कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. दोन्ही बाजूंकडून येणारी वाहने जिकडच्या तिकडेच थांबवण्यात आली. त्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. विद्युतप्रवाह बंद करून कर्मचाऱ्यांनी तारा हटवल्या.
 
सहा महिन्यापूर्वी.. 
सहा महिन्यांपूर्वीच खेर्डावाडी येथील काही ग्रामस्थांना घेऊन एक टेम्पो कंदुरीच्या कार्यक्रमासाठी धारूरकडे निघाला होता. तेव्हा हा टेम्पो धारूर घाटात आला असता तेव्हा अचानक उलटून दोघे जण ठार झाल्याची घटना घडली होती. 
 
पुढील स्लाइडवर पाहा अपघात झालेल्या वाहनांचे फोटोज्...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...