आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष : श्वानप्रेमासाठी अमेरिका टू लातूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - मराठवाड्याची वेगळी ओळख जगाला करून देणाऱ्या पश्मी व कारवान श्वानजातीचा शुद्ध वंश कायम राहावा व शास्त्रोक्त पद्धतीने या जीवांचे संगोपन अन् संवर्धन व्हावे, ही आंतरिक तळमळ घेऊन अमेरिकेतील तीन श्वानमित्रांनी चक्क लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांतील वाड्या-तांडे गाठले.
श्वानमालकांच्या भेटी घेऊन त्यांना श्वानपालनाची शास्त्रोक्त माहिती सांगितली. निसर्गाने या भूमीला दिलेली ही अनमोल भेट जतन करा, अशी कळकळीची विनंतीही त्यांनी केली. पंचतारांकित हॉटेलांत रात्रीचा मुक्काम व दिवसभर वाड्या-तांड्यावर पायपीट असा त्यांचा दिनक्रम राहिला.
भारतीय वंशाचे कॅनडातील श्वान अभ्यासक नील त्रिलोकीकर, उत्तर कॅरोलिनाच्या श्वान अभ्यासक व्हर्जिनिया पेरीगोल्ड व स्वित्झर्लंडमधील छायाचित्रकार अनिता लोपेश ग्राका यांना लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील पश्मी, कारवान श्वान जातींबद्दल उत्सुकता होती. त्यांची
फेसबुकच्या माध्यमातून लातूर कॅनाईन क्लबचे अध्यक्ष प्रमोद साळुंके व अॅड. अभय आरीकर, अजय पाटील यांच्याशी मैत्री जमवली.
श्वानांचे फोटो, माहितीचे आदानप्रदान व तासतास चॅटिंग हा सिलसिला सुमारे दीड वर्ष चालला. हाती येत गेलेल्या माहितीमुळे या परदेशी मित्रांची श्वानउत्सुकता शिगेला पोहोचली. डिसेंबर २०१४ मध्ये त्यांनी लातूर दौरा आखून जानेवारी २०१५ च्या तिसऱ्या आठवड्यात लातूर भेटीचा कार्यक्रम निश्चित केला होता. त्यानुसार त्यांनी हा दौरा केलाही.
अशी केली पायपीट

या जातींसाठी प्रसिद्ध असलेल्या चाकूर तालुक्यातील जानवळला भेट देऊन त्यांनी तेथील श्वानमालकांशी संवाद साधला. कारवान श्वानांच्या शोधात त्यांनी या परिसरातील अनेक वाड्या-तांडे तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा, कुर्डुवाडी पालथे घातले. जानवळचे श्वान राज्यातील अनेक ठिकाणी गेल्याचे कळल्याने त्यांनी याचा संदर्भ घेऊन कोल्हापूर, पंढरपूर, फलटण, सातारा व बारामती येथे दौरा केला. राज्याच्या विविध भागांत १८ दिवस त्यांची भटकंती सुरू होती.
कारवान जातीत भेसळ झाल्याचा निष्कर्ष

शास्त्रोक्त संगोपन व शुद्ध वंशजतनाभावी मराठवाड्यातील पश्मी व कारवान संकटात सापडले आहेत. वारंवार रक्ताच्या नात्यात घडवून आणला जाणारा संकर, शास्त्रोक्त पालनपोषणाचा अभाव, निरनिराळ्या आजारांमुळे क्षीण होत चाललेली रोगप्रतिकारक क्षमता व त्यामुळे येत असलेले कुपोषण हे या जातींच्या जिवावर बेतत आहे. सशाची पारध करण्याच्या शर्यतीत कारवान अधिक गतीने पळावे व बक्षीस मिळावे, हा हेतू ठेवून स्थानिक कारवानाचा ग्रे हँड जातीच्या श्वानाशी केलेला संकर यामुळे कारवान जातीत भेसळ झाल्याचा निष्कर्ष या अभ्यासकांनी नोंदवला आहे.
कारवानला अमेरिकेस घेऊन जाणार

^कारवान जातीच्या पिलांची जोडी आम्ही पुढील वर्षी अमेरिकेला नेणार आहोत. त्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव अन् जुळवाजुळव सुरू केली आहे. दरवर्षी आम्ही लातूर-उस्मानाबादला भेट देणार आहोत.नील त्रिलोकीकर , श्वान अभ्यासक, कॅनडा
वेदनादायी बाब

^निसर्गाने दिलेल्या या जातींचा अभिमान बाळगून त्या जतन करण्याऐवजी स्वार्थासाठी त्यावर कसलेही प्रयोग करणे हे वेदनादायी व लज्जास्पद आहे. हा वंश टिकवणे आपणा सर्वांची जबाबदारी अन् कर्तव्यही आहे. या जातींच्या शास्त्रोक्त संगोपनासाठीची माहिती आम्ही देऊ.
व्हर्जिनिया पेरीगोल्ड, अभ्यासक, कॅरोलिना