आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिघांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न, पदाधिका-यांच्या मध्यस्थीमुळे शेतक-यांचा जीव वाचला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - राजवाडी (ता. सेलू) येथील तिघा शेतक-यांनी कर्ज पुनर्गठनासाठी बँकेकडून होत असलेल्या टाळाटाळीच्या कारणावरून मंगळवारी (दि. २८) भारतीय स्टेट बँकेच्या सेलू शाखेत अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, विविध पक्षांच्या पदाधिका-यांनी मध्यस्थी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. बँकेने संबंधित शेतक-यांना लेखी पत्र दिल्यानंतरच हा प्रकार थांबला. मात्र, सामुदायिक आत्महत्येच्या प्रयत्नाने सेलू शहरात खळबळ उडाली होती. राजकिशोर जैस्वाल (३५), भास्कर शेवाळे (४५) व संजय शेवाळे (४०) अशी त्या शेतक-यांची नावे आहेत.

भारतीय स्टेट बँकेच्या सेलू शाखेअंतर्गत राजवाडी हे गाव दत्तक असल्याने या गावातील संपूर्ण शेतक-यांची भिस्त याच बँकेवर आहे. शेतकरी नंदकिशोर जैस्वाल यांना दोन लाख १० हजार, संजय शेवाळे यांना दोन लाख, राजकिशोर जैस्वाल यांना तीन लाख, बंकटलाल जैस्वाल यांना दोन लाख ८० हजार, तर भास्कर शेवाळे यांना ५४ हजार रुपये याप्रमाणे कर्जाची पुनर्गठन प्रकरणे प्रलंबित आहेत. यामधील भास्कर शेवाळे यांचे ५४ हजार रुपये तर मंजूर असूनदेखील त्यांना मिळालेले नाहीत. पाचही शेतक-यांना या प्रकरणातील उर्वरित रक्कम देण्यास बँकेचे व्यवस्थापक सारखी टाळाटाळ करत असल्याने त्यांना बँकेत अनेकदा खेटे मारावे लागले.
याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक काकडे, अॅड. रामेश्वर शेवाळे, कॉ. गुलाबराव पौळ, पंजाबराव पौळ, बापू डख, विठ्ठल कोकर व सेलू पोलिस ठाण्याचे निरीक्षक एस. पी. शिरसाट यांनी मध्यस्थी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. शेतक-यांनी बँकेकडून लेखी पत्र घेतल्यानंतरच आंदोलन थांबवले. या प्रकरणामुळे बँक परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

शाखाधिका-यांचे दुर्लक्ष
शेतक-यांनी यासंदर्भात सेलूचे तहसीलदार आसाराम छडीदार यांना बँकेकडून होत असलेल्या विलंबाची माहिती दिली होती. त्यावर तहसीलदारांनीदेखील बँकेस संबंधित शेतक-यांना कर्ज देण्याबाबत सांगितले होते. तरीही हा प्रश्न सुटत नसल्याने तीन शेतक-यांनी मंगळवारी बँकेत धाव घेतली. शाखाधिकारी अरुणकुमार चौधरी हे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास येताच त्यांनी सोबत आणलेल्या रॉकेलची बाटली अंगावर ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.