आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Student Injure In Electricity Wire Current In Ashti

‘धक्का’दायक, शाळेवर वीज तार कोसळून तीन मुलींना शॉक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदिरा कन्या विद्यालयाच्या मैदानावर विजेची तार तुटून जमिनीवर कोसळली. आगीमुळे जमिनीवर असा काळपटपणा आला होता. - Divya Marathi
इंदिरा कन्या विद्यालयाच्या मैदानावर विजेची तार तुटून जमिनीवर कोसळली. आगीमुळे जमिनीवर असा काळपटपणा आला होता.
आष्टी - आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील इंदिरा प्राथमिक कन्या शाळेत शनिवारी सकाळी पावणेदहा वाजता प्रार्थना सुरू असताना विजेची तार तुटल्याने सहावीच्या वर्गातील तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या. या घटनेमुळे प्रार्थनेसाठी एकत्रित जमलेली मुले सैरावेरा पळाली.

आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे इंदिरा प्राथमिक कन्या विद्यालय असून विद्यार्थी संख्या ४६४ आहे. पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्गही या ठिकाणी आहेत. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता विद्यालयात प्रार्थना सुरू असताना मैदानावरून गेलेल्या विजेच्या तारांचे घर्षण झाले. त्याच वेळी तार तुटून जमिनीवर पडली. यात सहावीच्या वर्गात शिकणार्‍या ताई गव्हाणे, संगीता गाढवे, मनीषा जगताप या विद्यार्थिनी जखमी झाल्या. ही दुर्घटना घडताच प्रार्थनेसाठी जमलेली मुले सैरावैरा मैदान सोडून पळाली. जखमी झालेल्या तीन मुलींवर गावातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी घटनास्थळी लाइन स्टाफ व अभियंता यांना पाठवले.

तारा हलवण्याची मागणी
धामणगाव येथील इंदिरा कन्या विद्यालयाच्या मैदानावरून गेलेल्या तारा दुसरीकडून ओढण्यात याव्यात यासाठी मी जुलै २०१३ मध्ये वीज कंपनीला पत्र दिलेले आहे, परंतु अद्याप वीज कंपनीने कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे आजचा प्रकार ओढवला आहे. - डी. एस. भुकण, मुख्याध्यापक

इमारत बांधण्यापूर्वीच्या तारा
या विद्यालयाची इमारत होण्यापूर्वी १९८० पासून या ठिकाणाहून विजेच्या तारा गेलेल्या आहेत. विद्यालयाची इमारत बांधत असताना आम्ही वीज तारांबाबत जागरूक राहण्यासाठी त्यांना बजावलेले होते. त्यांनी काळजी घेतली असती तर हा प्रकार घडला नसता. - विजय काळे, कनिष्ठ अभियंता