आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंटामुक्त 18 हजार गावांवर 460 कोटी रुपयांचा खर्च, गाव पातळीवरच प्रकरणांचा निपटारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील सहा विभागांतही चांगला प्रतिसाद मिळाला असून २००७ पासून सुरू झालेल्या मोहिमेंतर्गत आतापर्यंत १८ हजार ९८९ गावे तंटामुक्त झाली असून या तंटामुक्तीसाठी पुरस्कारापोटी तब्बल ४६० कोटी २५ लाख रुपयांचा निधी खर्च करावा लागला आहे. या रकमेतून अनेक गावांनी विविध समाजोपयोगी कामे केली आहेत.
   
गाव पातळीवरील वाद गावातच मिटविण्यासाठी तंटामुक्त अभियान यशस्वी ठरत आहे. गाव पातळीवर असलेल्या ग्राम संरक्षण दलाचाही या मोहिमेसाठी चांगली मदत होत आहे. दरम्यान, ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलिस प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयासह पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या गावांमध्ये या मोहिमेविषयी चांगली जनजागृती केली आहे. गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या तंटामुक्त मोहिमेमुळे गावातील वाद गावातच मिटवला जात आहे. विशेष करून या मोहिमेत तरुणांनी सहभाग नोंदवल्यामुळे सकारात्मक बदल दिसून येऊ लागला आहे. या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी तत्कालीन पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी नेहमीच आढावा घेत या मोहिमेचा पाठपुरावा ठेवला होता. दरम्यान, आता बदलून आलेले पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनीही ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी पोलिसांना सूचना केल्या आहेत. गाव पातळीवर असलेल्या समित्यांना त्यांची ध्येय धोरणे, गट चर्चा आदी माध्यमातून संपर्कात राहण्याचे आवाहन केले. राज्यभरात ही योजना चांगल्या प्रकारे राबविल्या जात आहे. यात सहा विभागातून नाशिक, अमरावती, नागपूर, कोकण, औरंगाबाद, कोल्हापूर या विभागात आतापर्यंत ४८ हजार ७४८ तंटे मिटविण्यात आली आहेत. या तंट्यांमध्ये दिवाणी, महसुली, स्थावर मालमत्ता, वारसा हक्क, वाटप हस्तांतरण, जंगम मालमत्ता खरेदी, विक्री, अतिक्रमणे, वाटप, शेतसारा, सार्वजनिक रस्ता, शेतात जाण्याचा रस्ता आदी प्रकारातील तंटे गाव पातळीवर मिटवण्यात आले आहेत.  
 
विकासकामांवर भर    
जिल्ह्यातील अनेक गावांनी तंटामुक्त पुरस्कारातून मिळालेल्या रकमेतून शाळांचा विकास, शाळा ई-लर्निंग करणे यासह विविध विकासकामे करण्याचा प्रयत्न केला. या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे गावांचा विकास होण्यासाठी मदत झाली आहे.   
 
तरुणांचा वाढला सहभाग    
गाव पातळीवर ग्रामसंरक्षण दल, शालेय समिती, शेतकरी मंडळ आदी प्रकारच्या विविध समित्या असतात. दरम्यान, तंटामुक्त समित्याही तयार करण्यात आल्या असून अनेकांना आपली समितीवर निवड झाली की नाही, याबाबतचीही माहिती नसते. यावर्षीपासून पारदर्शक काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.   
 
विभागनिहाय तंटे    
नाशिक विभागात १२००४, अमरावती ११८५७, नागपूर ९८२३, नागपूर ६५५८, औरंगाबाद ४४६४, कोल्हापूर ४०३१ असे ४८ हजार ७४८ तंटे मिटविण्यात यश आले आहे. यात तब्बल १८ हजार ९८९ गावे तंटामुक्त झाली आहेत.   
बातम्या आणखी आहेत...