आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • To Cleare Nationalist, Win Baramati Seats AAP Leader Vijay Pandhare Appeal

राष्ट्रवादीचा सफाया करा, बारामतीचीही सीट पाडा - ‘आप’चे विजय पांढरे यांचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - मलईदार खाते स्वत:कडे ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचाराचा शिरोमणी ठरला आहे. त्याची सफाई करणे गरजेचे असून येत्या निवडणुकीत या पक्षाच्या सर्व उमेदवारांसह बारामतीची सीटही पाडा, असे आवाहन आम आदमी पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी सोमवारी येथे केले. आपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. साहेबराव कदम, डॉ. सुधीर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. पांढरे म्हणाले, अधिक पैसा देणारी व भ्रष्टाचाराला सोयीची ठरणारी खाती राष्ट्रवादीने स्वत:कडे ठेवली आहेत. त्यामुळे हा पक्ष भ्रष्टाचारात नंबर वन ठरला आहे. आपच्या सर्मथ पर्यायामुळे शीला दीक्षितांची जी गत झाली आहे, ती बारामतीकरांची होण्यास आता काहीच अडचण नाही. काँग्रेस, भाजप, शिवसेनाही भ्रष्ट आहेत. घोटाळ्यात ते एकमेकांची साथ-संगत करतात. एखाद्या प्रकरणात चौकशी समिती नेमली तर तिला योग्यपणे काम करू देत नाहीत. प्रसंगी चौकशी होऊ देत नाहीत. भ्रष्ट अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई होत नाही.
पाहावे तिकडे अन् जावे तिकडे भ्रष्टाचारच भ्रष्टाचार असे नेटवर्क त्यांनी निर्माण केले आहे. पुढारी अन् दलाल आपणाला सांभाळून नेतात हे अधिकार्‍यांनी ओळखल्याने भ्रष्टाचार वाढत असून त्याच्या मुळावर घाव घालण्याची वेळ आली आहे. अशा व्यवस्थेची सफाई केल्याशिवाय देश सुधारणार नाही. तरुणाच्या माध्यमातून दिल्लीत परिवर्तन झाले असून महाराष्ट्रातही आपची ही छबी दिसणार आहे. प्रस्थापित पक्षांचा धुव्वा उडणार आहे. भ्रष्टाचाराची झळ तरुणांना अधिक बसत असून भ्रष्ट व्यवस्थेला हद्दपार करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असल्याचे ते म्हणाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ कमिट्या स्थापन करण्याच्या सूचना देऊन त्यांची कार्यपद्धती व कार्यकर्त्यांची मतदारांप्रति भूमिका यावरही त्यांनी सविस्तर मागदर्शन केले. पाटबंधारे खात्यातील उपसा सिंचन योजनेमुळे राज्याचे किती नुकसान झाले आहे, त्याच वेळी पुढारी, कंत्राटदार व दलाल कसे मालामाल झाले आहेत व होत आहेत, याचा लेखाजोखाही त्यांनी उपस्थितांसमोर ठेवला.
वाटाघाटी करणार्‍या राजू शेट्टींना नकार
पारदर्शी, स्वच्छ चारित्र्य, बेदाग उमेदवार आप देणार आहे. ते राजकीय पार्श्वभूमी नसलेले असतील. शेतकरी संघटनेला एखादी जागा दिली जाईल. तथापि, ती आपच्या तिकिटावर लढवावी लागेल. जागावाटपात आम्ही वाटाघाटी करणार नाही. वाटाघाटीचा विषय घेऊन आपशी जुडू पाहणार्‍या राजू शेट्टींना आम्ही नकार दिल्याचे पांढरे यांनी सांगितले.
नरेंद्र मोदींची हवा दोन महिन्यांपुरती
भाजपचे नरेंद्र मोदी यांची सुरू असलेली चर्चा, त्यांचा गवगवा केवळ दोन महिने चालणार आहे. त्यानंतर ही हवा गुल होणार असल्याचे पांढरे म्हणाले
राज्यातील दागींची यादी जाहीर करणार
महाराष्ट्रातील दागी मंत्री व पुढार्‍यांची यादी लवकरच मुंबईत जाहीर करणार असल्याचे पांढरे यानी सांगितले.