आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद सोमवार: कोंढा गावात आज साजरा होतोय वार्षिक विवाहोत्सव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेंढा गावात गेल्या वर्षी झालेल्या सामुदायिक विवाहाचे छायाचित्र
कोंढा (नांदेड) - सामूहिक विवाह सोहळे नेहमीचेच; पण नांदेड जिल्ह्यातील कोंढा गावात २५ वर्षांपासून गावातील मुलींचे विवाह दरवर्षी एकाच दिवशी एकाच मांडवात लागतात. मुलगी इंजिनिअर असो वा अल्पशिक्षित, श्रीमंत असो वा गरीब, बोहल्यावर एका रांगेत उभ्या राहतात. अशाच ८ गावभगिनी सोमवारी ११ मे रोजी विवाहबद्ध होत आहेत.

वधूपित्याकडून वर्गणी घेऊन हा सोहळा केला जात असला तरी किती वर्गणी द्यायची अशी अट नसते. वधूपिता आपल्या क्षमतेनुसार त्यात सहभाग नोंदवतात. यंदा एका वधूनेच ७५ हजार रुपये दिले आहेत, तर एक वधूपिता अवघे वीस हजार रुपये देऊ शकला आहे. सर्वाधिक आर्थिक योगदान देणारी ही वधू इंजिनियर आहे आणि तिच्यासह एकाच मांडवात विवाहबद्ध होत असलेल्या अन्य वधू बारावी आणि दहावीपर्यंतच शिकलेल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यातल्या कोंढा या अवघ्या २७०० लोकसंख्येच्या या गावात गेल्या २४ वर्षात ३७० मुलींचे विवाह अशाच पद्धतीने झाले आहेत. त्यात विविध जातीच्या आणि विविध आर्थिक स्तराच्या वधूंचा समावेश आहे. सर्व वधूंचे लग्न एकाच पद्धतीने लावण्यात आली आणि वाईट रुढींना फाटा दिला गेला. अत्यंत शिस्तीत होणा-या या विवाह सोहळ्यासाठी अटी असतात वर पक्षासाठी. त्यांनी वेळेत लग्न मंडपात आले पािहजे, हुंडा न घेता विवाहाला तयार असले पािहजे इत्यादि. अर्थात, विवाह आयोजन समितीही शिस्त आणि कायदे पाळते. मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नाही, याची खात्री केली जाते. लग्न वेळेत लागेल, याची काळजी घेतली जाते. वरांची घोड्यावरून मिरवणूक काढली जात नाही. त्यांना वाजत गाजत मारूती मंदिरातून आणले जाते.

शेतकरी संघटनेचे योगदान
स्वांतत्र्यपूर्व काळापासून गावात सामुहिक विवाहाची परंपरा आहे. त्या काळी नदीकाठी वऱ्हाडासाठी पाणी, सावली केली जायची. गावातील तीन, चार जण आपल्या मुलींची एकत्र लग्ने लावायचे. बैलगाडीने नववधू सासरी जायची. नव्वदच्या दशकात गावात शेतकरी संघटनेचे वारे वाहत होते. लोकांचा बाहेरच्या जगाशी संबंध येत होता. त्यातूनच या प्रघातात सुधारणा करण्याचे ठरले. दादाराव पाटील, आर. डी. कदम, हरिभाऊ कदम, बाबुराव कोंढेकर, कोंडीबा पोलीस पाटील, महादेव गणकर आदींनी १५ एप्रिल १९९० रोजी ग्रामस्थांची बैठक घेतली आणि त्यात या उपक्रमाचा विस्तार झाला. यामुळे वेळ, पैसा, अन्नधान्य, मनुष्यबळाची बचत होत आहे, अशी आठवण ६५ वर्षीय सरस्वती बाबुराव कदम यांनी सांगितली.

अख्खा गाव असतो व्यवस्थापक
- गावातील मुलीची सोयरिक जमल्यावर तिचे वडिल पंचकमिटीला ती माहिती देतात. कमिटी त्याची नोंद करून घेते.
- मार्चअखेरपर्यंत लग्नांची संख्या पाहून एक तिथी ठरवली जाते. वरपक्षाकडे तसे पत्र जाते.
- गावातील तरुणांची बैठक होते. गटनिहाय कामे वाटून दिली जातात. गटप्रमुख नोंदी ठेवतो.
- पंचकमिटी वरपित्यांकडून वऱ्हाडींची संख्या घेते. आचारी, मंडपासह खर्चाचा ताळेबंद ठरतो.
- वधुपित्याची आर्थिक परिस्थिती पाहून पंचकमिटी लग्नखर्च वर्गणीच्या स्वरुपात जमा करून घेते.
मुलांचे लग्न नेहमीप्रमाणेच
गावातील मुलींचा विवाह असा एकत्रित रित्या केला जातो. मात्र, गावातील मुलाचा विवाह सोयीनुसार मुलीच्या गावी जाऊन करण्याची मोकळीक वरपित्यांना आहे. त्यात अजून काही बदल केलेला नाही.
यंदा वधूंत इंजिनिअर ते दहावी उत्तीर्ण मुली; वधूपित्याच्या ऐपतीप्रमाणे लग्नखर्च
1 चंद्रकला अशोक कदम शिक्षण बी. ई. (सिव्हिल).
भूमी अभिलेखमध्ये लिपिक आहे. सोहळ्यासाठी ७५ हजार दिले. माझे लग्न मी धामधुमीत केले असते, पण गावाची परंपरा जपतानाच गरीब मुलींना मदत व त्यांच्यासोबत आनंद द्विगुणित करायचा होता, अशी भावना चंद्रकलाने व्यक्त केली.
2 शारदा गणेश ठेंगल
वडील मजुरी करतात. लग्नासाठी २० हजार रुपये दिले.
3 शीतल संजय खानसुळे
शिक्षण दहावी, वडील ऑटो चालवतात, तर आई मजुरी करते. ३१ हजार रुपये दिले.
4 सीमा उत्तमराव कदम
शिक्षण दहावी. शिवणकाम करते. दोन भाऊ, तीन बहिणी. सीमा थोरली. दोन एकर कोरडवाहू शेती. लग्नासाठी ३१ हजार दिले.
5 सोनुबाई गणपती जाधव
शिक्षण दहावी. लहानपणीच पितृछत्र हरपले. मामाकडे राहते. आई मजुरी करते. लग्नासाठी ३१ हजार रुपये दिले.
6 सीमा रामराव कदम
शिक्षण बारावी. घरची परिस्थिती बेताची. पाच बहिणी, एक भाऊ अाहेत. एक एकर शेतीवर कुटुंबाची गुजराण हाेते. २५ हजार रुपये लग्नखर्च म्हणून दिले अाहेत.
7 मनीषा गंगाधर पांचाळ
शिक्षण बारावी. एक एकर शेती. लग्नाला २५ हजार रुपये दिले.
8 शांता लक्ष्मण कदम
शिक्षण १२ वी. दोन एकर कोरडवाहू शेती. लग्नासाठी ३५ हजार रुपये दिले.
यंदा विवाहबद्ध होणा-या मुली सर्व स्तरांतील आहेत. ७५ ते २० हजार रुपयांपर्यंत लग्नखर्च म्हणून पंचकमिटी घेणार
चिखली तालुक्यात १० मुलींचे कन्यादान
चिखली तालुक्यातील दिवठाणा येथे ११ मे राेजी ‘एक गाव एक लग्न तिथी’ कार्यक्रम होत आहे. साेहळयात १० मुलींचे कन्यादान केले जाईल. जादा खर्च करून कर्जबाजारी हाेणे टाळावे तसेच मानपान, रुसवेफुगवे, वेळ व पैशाची उधळपट्टी राेखण्यात यावी या उद्देशाने हा साेहळा हाेत अाहे. या साेहळ्यात काेणतेही सत्कार समारंभ करण्यात येणार नाहीत.