आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Bhoomipujan Of Gopinathgad Memorial, Chief Minister Fadanvis Present

गोपीनाथगड स्मारकाचे आज भूमिपूजन, मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात गोपीनाथगड स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता होणार आहे.

परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे समाधिस्थळ आहे. याच स्थळाच्या ठिकाणी गोपीनाथगड स्मारक उभारले जाणार आहे. या वेळी भगवानगडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री महाराज व राष्ट्रसंत भय्यू महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दस-याला भगवानगड, तर बारा डिसेंबरला गोपीनाथगडावर दरवर्षी भगवानबाबांचे भक्त व गोपीनाथ मुंडे समर्थकांचा मेळावा होणार असल्याने गोपीनाथगडाला विशेष महत्त्व येणार आहे. वैद्यनाथ साखर कारखान्याच्या परिसरात ३० बाय ५० फुटांचे आणि ४०० बाय ५०० फूट आकाराचे मंडप उभारण्यात आले आहेत.

कार्यक्रमाला राज्यभरातील कार्यकर्त्यांची गर्दी होणार असल्याने परळी-बीड मार्गावरील पांगरी येथून जाणा-या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. परळी येथून सिरसाळ्याकडे जाणारी वाहतूक टोकवाडीपासून नागापूर व मांडेखेलमार्गे वळवण्यात आली आहे. सिरसाळ्याकडून येणारी वाहतूक वडखेल फाट्यापासून मांडेखेल व नागापूरमार्गे वळवण्यात आली आहे.

स्थानिक प्रशासन अलर्ट
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम व जिल्हा पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी
यांनी स्थळाला भेट दिली. स्थानिक प्रशासनाला सूचनाही दिल्या आहेत. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनीही गुरुवारी सायंकाळी समाधिस्थळी पाहणी केली.