परभणी- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी वारकऱ्यांची विशेष गर्दी लक्षात घेता रविवारी (दि. २६) मराठवाड्यातून पंढरपूरसाठी पाच विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वेने नगरसोल, आदिलाबाद, परळी, बीदर आणि लातूर येथून ३० जुलैपर्यंत दैनंदिनसहित पाच विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यात लातूर-पंढरपूर या दैनंदिन रेल्वेचाही समावेश आहे.
यात प्रथम रेल्वे रविवारी सकाळी सात वाजून १० मिनिटांनी लातूरहून पंढरपूरकडे धावणार आहे. दुसरी रेल्वे आदिलाबाद-पंढरपूर ही आदिलाबादहून दुपारी अडीच वाजता निघेल. तिसरी नगरसोल-पंढरपूर ही विशेष रेल्वे नगरसोलहून संध्याकाळी पावणेसहा वाजता, चौथी बिदर-पंढरपूर विशेष रेल्वे उदगीर, लातूरमार्गे बिदरहून रात्री नऊ वाजता आणि परळी-पंढरपूर विशेष रेल्वे परळीहून रविवारी रात्री साडेदहा वाजता निघणार आहे.