आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलदारांचा पोलिस अधिकाऱ्याने अपमान केला; कर्मचाऱ्यांचे आज काम बंद आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना धक्काबुक्की करून अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी अपर पोलिस अधीक्षक विश्व पानसरे तसेच गंगाखेड येथील तलाठी मुरकुटे यांना मारहाण केल्याप्रकरणी गंगाखेडचे पोलिस निरीक्षक सोपान सिरसाठ या दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काम बंद आंदोलन करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. दरम्यान, उद्या बुधवारी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत लेखणी बंद आंदोलन केले जाणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.   

महसूल कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनास राजपत्रित अधिकारी महासंघ, राज्य महसूल कर्मचारी संघटना व राज्य तलाठी संघानेही पाठिंबा दिला आहे. राजपत्रित अधिकारी महासंघ व मध्यवर्ती कर्मचारी संघटना यादेखील जिल्हा स्तरावरील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे महसूल विभागाचे कामकाज मंगळवारी ठप्प झाले.
   
काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यादरम्यान तहसीलदार कडवकर हे सभास्थळी जात असताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक  पानसरे यांनी त्यांची सखोल चौकशी करीत अपमानास्पद वागणूक दिली. कडवकर यांनी सुरक्षा पास दाखवल्यानंतरही पानसरे यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न केला. उद्धटपणाची भाषा करून त्यांना अपमानित केले. या घटनेचे पडसाद जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात उमटले. महसूल कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी विभागीय आयुक्तांपर्यंत  पानसरे यांची तक्रार दाखल केली. या घटनेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर झाला होता. महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणारा हा प्रकार असल्याचे नमूद करीत पानसरे यांचा कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवला. त्यांना सेवेतून निलंबित करीत शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी  राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचे विभागीय अध्यक्ष किरण अंबेकर, विभागीय संघटक विजय चव्हाण यांनी केली आहे.   
 
बातम्या आणखी आहेत...