आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सक्लुझिव्ह: ‘त्या’ 44 टोलनाक्यांवर इनकॅमेरा वाहन गणती !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- टोलमाफीची घोषणा केल्यानंतर राज्यातील टोलवसुली करणारे कंत्राटदार न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्यामुळे शासनाने कंत्राटदारांना वाहन गणती करूनच परतावा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुधवारी रात्रीपासून राज्यातील टोलमाफी दिलेल्या मार्गावर इनकॅमेरा वाहन गणती सुरू करण्यात आली आहे. ही गणती 15 दिवस चालणार आहे. विशेष म्हणजे इनकॅमेरा वाहन गणतीवर पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांचेच नियंत्रण राहणार असून याचे सर्व रेकॉर्डिंग बांधकाम विभागाकडेच जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.

10 कोटींपेक्षा कमी खर्चाच्या रस्त्यांवर टोलवसुली बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने सोमवारी सायंकाळी जाहीर केला आहे. टोलवसुलीची मुदत असलेल्या कंत्राटदारांना परतावा देण्याची शासनाची तयारी आहे. त्यासाठी अंदाज काढण्यात येत आहे. मात्र, टोलवसुलीची मुदत असलेले कंत्राटदार शासनाच्या या निर्णयाविरुद्ध न्यायालयात जाण्याची शक्यता असून त्यामुळे शासनाने वाहन गणती करून परतावा देण्याची योजना आखली आहे. वाहनांच्या गणतीमधून टोलनाक्यावर कंत्राटदाराला किती उत्पन्न मिळते, याचा अंदाज बांधून परतावा देण्यात येणार आहे. त्यामुळे शासनाने धुव्र कन्सल्टन्सीमार्फत इनकॅमेरा वाहन गणती करण्याचे आदेश काढले आहेत. 9 जूनपासून वाहन गणती करण्यात येणार होती. मात्र, काही भागात कन्सल्टन्सीचे प्रतिनिधी 10 आणि 11 जूनला पोहोचले आहेत. त्यामुळे वाहनगणतीचे काम विविध मार्गांवर बुधवारी रात्रीपासून सुरू झाले आहे. कन्सल्टन्सीचे प्रत्येकी 10 प्रतिनिधी इनकॅमेरा संगणकीय पद्धतीने वाहनगणती करतील. दिवस-रात्र चोवीस तास हे काम सुरू राहील. 15 दिवसांच्या गणतीनंतर शासनाला अहवाल सादर करण्यात येणार असून त्यानंतर कंत्राटदारांना परतावा किती द्यायचा, याचा तपशील स्पष्ट केला जाईल.
नियंत्रण बांधकाम विभागाकडे
शासनाने कन्सल्टन्सीच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. मात्र, या समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधीक्षक अभियंता यांची नेमणूक केली आहे. याबरोबरच गुणनियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापकांचाही समितीत समावेश आहे.

कॅश फ्लोचा अंदाज
टोलनाक्यांना दररोज नेमके किती उत्पन्न मिळते, याचा अंदाज बांधण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. कन्सल्टन्सीच्या या कामामध्ये मदतीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यांनाही ड्युट्या देण्यात आल्या आहेत.

बुधवारपासून झाली सुरुवात, कंत्राटदारांना परतावा देण्यासाठी शासनाकडून बांधला जातोय अंदाज, टोलनाके बंद होणार्‍या मार्गावर 15 दिवस चोवीस तास मोजणी