आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरग्‍यामध्‍ये काम 1 कोटीचे; टोलधाड 25 कोटींची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा- महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पुणे येथील भाषणात उल्लेख झालेल्या उमरगा तालुक्यातील पुणे-हैदराबाद राष्‍ट्रीय महामार्गावरील येणेगूर टोलनाक्याची वसुली सोमवारपासून बंद झाली. मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी टोलनाका बंद केला. त्याला कंत्राटदारानेही साथ दिली. 1 कोटी 29 लाख रुपयांच्या कामासाठी कंत्राटदाराने बारा वर्षांत सुमारे 25 कोटी रुपये वाहनधारकांकडून वसूल केले. त्यात एसटीने सुमारे 1 कोटी 46 लाख रुपये टोलच्या माध्यमातून भरले आहेत.

येणेगूर गावाच्या बेन्नीतुरा नदीवरील अरुंद पूल पाडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्प शाखेने 1 कोटी 29 लाख रुपये खर्चून 2002 मध्ये नवीन पूल बांधला. त्याचा खर्च टेंडर प्रक्रियेद्वारे टोल आकारणीच्या माध्यमातून खासगी कंपनीवर सोपवण्यात आला. परभणी येथील कंपनीला एका वर्षासाठी जवळपास 1 कोटी 60 लाखांचे टेंडर देण्यात आले. त्यानंतर पुढील काळात टेंडरची रक्कम वाढतच गेली. यानंतरच्या काळात धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील अग्रवाल यांना 2 कोटी 60 लाख रुपयांत, 2012 मध्ये घई कन्स्ट्रक्शन (औरंगाबाद ) 3 कोटी 10 लाख, फेब्रुवारी 2013 मध्ये पाटील कन्स्ट्रक्शन (सोलापूर) 3 कोटी 64 लाखांना टेंडर देण्यात आले. ही मुदत 20 फेब्रुवारी (2014) रोजी संपत आहे. नवीन टेंडर होईपर्यंत जुन्याच कंपनीला 3 महिन्यांसाठी मुदतवाढ दिल्याचे टेंडरमध्ये नमूद आहे.

सहा जणांवर गुन्हे
आंदोलनकर्ते जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, अविनाश साळुंके, राजू तुंगे, धैर्यशील दरेकर, अजीम पटेल, शाहूराज सावंत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.


राज्य परिवहन महामंडळाला दीड कोटीचा भुर्दंड
या टोलनाक्यावरून दररोज 170 बसेस जातात (अन्य राज्याच्या बसेस वगळून ). एका बसला 20 रुपये आकारले जातात. यानुसार दररोज 3400 रुपये तर महिन्याला 1 लाख 2 हजार व वर्षाला 12 लाख 24 हजार वसूल होतात.

लुटुपुटूची कारवाई
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी पुणे येथील सभेत येणेगूर टोलनाक्याचा उल्लेख केल्यानंतर सोमवारी सकाळी माध्यमांचे प्रतिनिधी येणेगूर टोलनाक्यावर वार्तांकनासाठी गेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मनसेचे काही पदाधिकारी टोलनाक्यावर दाखल झाले. मात्र, कंत्राटदाराने स्वत: टोलवसुली बंद करीत असल्याचे लेखी पत्र दिल्याने काही अनुचित प्रकार घडला नाही.

बनावट पावत्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट
एकीकडे पुलाच्या बांधकामाची रक्कम वसूल होऊनही टोल आकारणीसाठी शासनाकडून टेंडर देणे चालूच आहे. यामध्ये राजकीय नेत्यांसह अधिका-यांची मोठी साखळीच सहभागी असल्याचे बोलले जात आहे. खोट्या पावत्या छापून अग्रवाल यांनी 2010 मध्ये वाहनधारकांकडून 80 ते 200 रुपयांपर्यंत टोल वसूल केला. तक्रारीनंतर तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण गेडाम यांनी कारवाई केली. डॉ.गेडाम यांनी सुमारे 1 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या जप्त केल्या होत्या. या वेळी गुत्तेदार विनोद अग्रवाल, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंत्यासह 28 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.