आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Toll News In Marathi, Social Activist Anna Hajare Strike For Toll Issue, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिफारस करूनही टोल ठेकेदारावर कारवाई नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- मनसेच्या टोलविरोधी आंदोलनानंतर आता समाजसेवक अण्णा हजारे यांनीही टोलबाबत सरकारला धारेवर धरल्याने सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून तक्रारी असूनही कारवाईबाबत डोळेझाक करणा-या बांधकाम विभागाचा तसेच महामार्ग विभागाचा भोंगळ कारभार येणेगूर येथे तीन वर्षांपूर्वीच्या कारवाईनंतरच्या प्रक्रियेवरून चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी ठकबाजी करणा-या के. जी. अ‍ॅग्रो प्रोसेसर कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस बांधकाम विभागाच्या राष्‍ट्रीय महामार्ग कार्यालयाने केली होती; परंतु याबाबत काहीच कारवाई झाली नसल्याने वर्षभरापर्यंत या कंपनीचे सहापेक्षा जास्त टोलनाके कार्यरत होते.
येणेगूर येथील पुणे-हैदराबाद राष्‍ट्रीय महामार्गावर असलेल्या टोलनाक्यावर 28 आॅगस्ट 2010 रोजी विशेष पथकाने कारवाई करून जवळपास एक कोटींची जादा दराची पावतीबुके जप्त केली. याप्रकरणी के. जी. अ‍ॅग्रो प्रोसेसर लि. शिरपूर (जि.धुळे) या कंत्राटदार कंपनीच्या संचालकासह अधिकारी, कर्मचारी व महामार्ग विभागाच्या अधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याचा तत्कालीन उपविभागीय अधिका-यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. यामधून अनेक धक्कादायक प्रकार समोर आले.
सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. यामध्ये पथकर नाक्यावर वाहनधारकांकडून अनुक्रमे 5, 10, 15 रुपये वसूल करण्याचे आदेश असताना वाहनधारकांकडून 30, 40, 50, 70, 100, 120, 150, 180, 200 रुपयांपर्यंत रक्कम वसूल केली जात होती. हा गंभीर प्रकार अनेक वर्षांपासून सुरू होता. याबाबत तक्रारीही करण्यात येत होत्या. मात्र, कारवाई तर दूरच, त्याच ठेकेदाराला तीन वेळा मुदतवाढ दिली. या संपूर्ण प्रकरणाचा तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी भंडाफोड केला. याची दखल घेऊन उस्मानाबाद येथील राष्‍ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कंत्राटदाराची अनामत जप्त करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केली होती. या शिफारशीला तीन वर्षे लोटली तरी कंत्राटदारावर काहीही कारवाई झाली नाही.
के. जी. अ‍ॅग्रो प्रोसेसरच्या इतर टोलनाक्यांवर कारवाई नाही
येणेगूर येथे जादा दराने होत असलेल्या टोलवसुलीचा जिल्हाधिका-यांनी भंडाफोड केल्यानंतर पोलिसांनी पावतीबुक छापून देणा-या लातूरच्या ऑफसेट प्रिंटर्सच्या मालकाचीही चौकशी केली. यामध्ये या प्रेसमधून येणेगूरबरोबरच के. जी. अ‍ॅग्रो प्रोसेसरच्या अग्रवाल बंधूंच्या मागणीनुसार त्यांच्या कंपनीसाठी मंठा नाका, लातूर रोड, घरणी, आदिलाबाद व आंबेसांगवी या ठिकाणच्या टोलनाक्यांसाठीही पावतीबुक छापून देण्यात आल्याचे कबूल केले; परंतु येणेगूर येथील टोलनाक्याव्यतिरिक्त तपासातून समोर आलेल्या इतर टोलनाक्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
कारवाईही लटकली
येणेगूर येथील प्रकरण उघडकीस आल्यानंतर उस्मानाबाद येथील राष्‍ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी के. जी. अ‍ॅग्रो प्रोसेसर कंपनीच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने कंपनीची अनामत रक्कम जप्त करण्याची तसेच के. जी. अ‍ॅग्रो प्रोसेसर या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस 7 सप्टेंबर 2010 रोजी अधीक्षक अभियंत्याकडे केली. त्यानुसार अधीक्षक अभियंत्यांनी ही शिफारस मुंबई येथील मुख्य अभियंत्यांकडे पुढील कारवाईसाठी पाठवली. मात्र, शिफारस पाठवून साडेतीन वर्षे झाली तरी कारवाई काय झाली, याबाबत कोणाकडेच माहिती नाही.
माहितीबाबत टोलवाटोलवी
या कारवाईच्या अनुषंगाने विशेष प्रकल्प विभागाच्या उस्मानाबाद येथील कार्यालयात संपर्क साधला असता याबाबत येथे काहीच माहिती नाही, औरंगाबादला संपर्क करा, असे सांगण्यात आले. त्यानुसार औरंगाबादच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात संपर्क साधला असता हे कार्यालय फ क्त ‘मेडिटिअर’ म्हणून काम करते. कारवाईसंदर्भात उस्मानाबादलाच माहिती विचारा, तेथेच माहिती मिळेल, असे सांगण्यात आले. एकंदरीत त्यांच्या अधिकाराखाली काम करणा-या कं त्राटदार कंपनीवरील कारवाईबाबत त्यांनाच माहिती नाही, यावरून आश्चर्य व्यक्त होत असून हा टोलवाटोलवीचा प्रकार असल्याचे समोर आले.