आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जबाजारीपणा, नापिकीमुळे दोन शेतकऱ्यांची बीड जिल्ह्यात आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव, बीड - जिल्ह्यात कर्जबाजारीपणा, नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येची मालिका सुरूच असून मंगळवारी पुन्हा नित्रुड व चौसाळा येथे दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
तालुक्यातील नित्रुड येथील शेतकरी तुकाराम रामकिसन जाधव (३१) या शेतकऱ्याला शिवारात दीड एकर जमीन होती. मागील तीन महिन्यांपासून कमी पाऊस पडत असल्याने शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड झाली नव्हती. तुकाराम जाधव याने सोसायटीकडून २० हजार, तर विजया अर्बन बँकेकडून ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याचबरोबर खासगी सावकाराकडून दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यंदा कमी पावसामुळे कापसाचे पीक हातचे गेले, आता कर्ज कसे फेडणार या चिंतेत तुकाराम रामकिसन जाधव यांनी राहत्या घरी सोमवारी महालक्ष्मी विसर्जनाच्या दिवशीच विष घेतले. उपचारासाठी त्याला अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी पहाटे शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. दुसरी घटना बीड तालुक्यातील चौसाळा येथे घडली आहे. उमेश शेषेराव ढास (रा. घारगाव) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
नऊ महिन्यांत १९९ आत्महत्या
जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून कमी पावसामुळे दुष्काळाचे संकट ओढवत असून नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. नऊ महिन्यांत १९९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गतवर्षी १५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २००५ पासून १०३५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. १३२ शेतकरी कुटंुबाना सरकारी मदत मिळाली असून ४८ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. १९ प्रकरणे प्रलंबित आहेत. गेवराईसह बीड, केज, अंबाजाेगाई तालुक्यांत आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे.