आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाशीमच्या दोघांचा हिंगोलीजवळ खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी वाशीम येथून हिंगोलीकडे येणाऱ्या मोटारसायकलस्वारांना इंडिका कारने धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर धारदार शस्त्रांनी वार करून एका व्यक्तीसह १२ वर्षीय मुलीचा खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास कलगाव पाटीजवळ घडली.

घटनेची माहिती देण्यास मात्र पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत टाळाटाळ केल्याने खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. वाशीम येथील दादू भिका मांजरे (३५) हा त्याची मेहुणी मुन्नीबाई तिची मुलगी शहनाज युसूफ (१२) हे मोटारसायकलने हिंगोलीकडे येत होते. वाशीम रस्त्यावरील माळहिवरा-कलगाव पाटीदरम्यान आलेल्या या मोटारसायकलला मागच्या बाजूने आलेल्या कारने (एमएच-१२-५७१२) उडवले. कारच्या धडकेने रस्त्यावर पडलेल्या दादू मांजरे याच्यावर हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार केले. यामध्ये शहनाजही गंभीर जखमी झाली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तर मुन्नीबाई मांजरे गंभीर जखमी झाली. तिला येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी नाकेबंदी करून हल्लेखोरांना कळमनुरी रस्त्यावरील सावरखेडा पाटीजवळ पकडले. कारमधील रफिक गंगू पप्पूवाले आणि अझहर अब्दुल पप्पूवाले यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी जखमी महिला मुन्नीबाई मांजरे हिच्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. जखमी मुन्नीबाईकडून मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हे त्यांचे नातेवाईक आहेत.