आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोड बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड- सिल्लोड बसस्थानकातून जळगावकडे जाणार्‍या व येणार्‍या बसेसमुळे अण्णाभाऊ साठे चौकात नियमितरीत्या वाहतुकीची कोंडी होते. हा रस्ता अरुंद असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जळगावच्या बसेस वळण रस्त्यावरून बसस्थानकात आणण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

औरंगाबाद-बर्‍हाणपूर राष्‍ट्रीय महामार्गावर सिल्लोड शहर असल्याने येथून दोन राज्यांत मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमुळे पर्यटकांचा प्रवास मोठ्या प्रमाणात सुरू असतो. जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी केंद्र व शासकीयदृष्ट्या सिल्लोड शहराचे महत्त्व आहे. व्यापार उद्योगामुळे महाराष्ट्राभरातून व बाहेरून येथे व्यापारी नेहमी येतात.

एवढेच नव्हे तर उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालये येथे असल्याने लगतच्या कन्नड व सोयगाव तालुक्यांतून नागरिक कार्यालयीन कामांसाठी येथे येतात. यामुळे शहरात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. साधारणपणे दररोज दहा हजार प्रवासी येथे येजा करतात. तर बहुतांश प्रवासी बसने प्रवास करीत असल्याने बसची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. या बसस्थानकातून सिल्लोड आगाराच्या जळगाव व औरंगाबादकडे 54 फेर्‍या, तर जळगाव आगाराच्या 40 फेर्‍या होतात. जळगावकडून येणार्‍या व जाणार्‍या सर्व बस शहरातील मुख्य रस्त्यावर व बसस्थानकालगत असलेल्या अण्णाभाऊ साठे चौकातून बसस्थानकात जाण्यासाठी वळतात. साठे चौक ते बसस्थानक हा अत्यंत अरुंद रस्ता असून या रस्त्यावर पानटपर्‍या, किरकोळ विक्रेत्यांची दुकाने, रिक्षा स्टँड, फळांच्या गाड्या उभ्या करण्यात येत असल्याने दोन बस समोरासमोर आल्या की वाहतुकीची कोंडी होते. रस्त्यालगतच तहसील असल्याने शेकडो वाहने उभी असतात. या चौकात कायम वाहतुकीची कोंडी असते. जळगाव येथून येणार्‍या किंवा जाणार्‍या कुठल्याही एकीकडच्या बसची वाहतूक वळण रस्त्याने वळवण्याची मागणी होत आहे.

पत्र देऊनही उपयोग नाही
सिल्लोड आगाराच्या बस वळण रस्त्यावरूनच येतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही हा मार्ग स्वीकारला आहे, परंतु यासंदर्भात जळगाव तसेच भुसावळ येथील आगारप्रमुखांना पत्र दिले होते. पत्र देऊनही त्यांच्या आगाराच्या बस शहरातून या रस्त्याने येतात.
-श्याम महाजन, आगारप्रमुख.