आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीत आदिवासींचे शक्तिप्रदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - धनगर समाजासह इतर बिगर आदिवासी जातींचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात येऊ नये, या मागणीसाठी परभणी येथे सोमवारी जिल्ह्यातील आदिवासी समाजाने मोठे शक्तिप्रदर्शन करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पारंपरिक वेशभूषा व आदिवासी वाद्य, नृत्य सादर करून मोर्चाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.

शनिवार बाजार येथून दुपारी साडेबारा वाजता नानलपेठ, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, स्टेशन रोडमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून आदिवासी समाजबांधव मोर्चात सहभागी झाल्याने जवळपास दहा हजारांवर नागरिकांचा हा मोर्चा मोठा ठरला.

धनगर समाज हा आदिवासी नसल्याचे राज्यातील समाजाच्या नेतेमंडळींनी पुराव्यानिशी मुख्यमंत्र्यांसमोर सिद्ध केलेले असताना काही राजकीय व्यक्तींनी धनगर समाजबांधवांची दिशाभूल करून जातीय तिढा निर्माण केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय स्वार्थापोटी दबावतंत्राचा वापर करून नियोजनबद्ध आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासी जमातींमध्ये धनगर समाजाचा समावेश करण्याचा कुटिल डाव आखला आहे. याबद्दल समस्त आदिवासींमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याच्या भावना समाज बांधवांनी व्यक्त केल्या.

(फोटो : परभणी येथे आदिवासी समाजाने बिगर आदिवासींना अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यात येऊ नये, या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात आदिवासींनी पारंपरिक वाद्यांसह नृत्य सादर केले. छाया : योगेश गौतम, परभणी.)