आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धांजली: नांदेडला मिळाली चार जिल्ह्यांसाठी फॉरेन्सिक लॅब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- आर. आर. पाटील यांनी कधीही संकुचित प्रांतवादाची भूमिका घेतली नाही. राज्यातील कोणत्याही भागाचे लोककल्याणकारी काम असो ते तातडीने करीत असत, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी सोमवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
मी मुख्यमंत्री असताना ते गृहमंत्री होते. नांदेडला फॉरेन्सिक लॅबची (न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा) आवश्यकता होती. त्यांच्याकडे हा प्रस्ताव गेला. त्या प्रस्तावावर सर्वंकष विचार करून त्यांनी निर्णय घेतला आणि फाॅरेन्सिक लॅबला मान्यता दिली. या लॅबमुळे नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या चार जिल्ह्यांत घडलेले गुन्हे उघडकीला आणण्यास मोठी मदत होणार आहे. विशेष म्हणजे माझे मुख्यमंत्रिपद गेल्यावर त्यांनी हा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे भोकरला पोलिस प्रशिक्षण केंद्राची मान्यताही त्यांनीच दिली. व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेसाठी नांदेडला एसपीयु (विशेष सुरक्षा दल) आहे. ही शाखा औरंगाबाद नंतर नांदेडलाच आहे. ती शाखा हलवण्याचा मध्यंतरी प्रयत्न झाला, परंतु पाटील यांनी गृहमंत्री असताना ती शाखा हलवण्यास विरोध करून ती शाखा नांदेडलाच ठेवली. नांदेड येथील पोलिस नियंत्रण कक्ष अत्याधुनिक करण्याचा निर्णयही त्यांनीच घेतला. स्वत: लक्ष घालून ते काम पूर्ण केले. नांदेड संवेदनशील असल्याने आबांच्या या निर्णयाचा जिल्ह्याला मोठा फायदा झाला.

माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अनेक वेळा काही निर्णयांमुळे खटके उडायचे. राष्ट्रवादीचे इतर नेते अनेक वेळा आक्रमक होत असत, परंतु आर. आर. पाटील मात्र अत्यंत शांत, संयमी राहत असत, असेही चव्हाण म्हणाले.