आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राम योजनांचा पाया आबांनी रचला, पोलिस भरतीही पारदर्शक केली- आमदार राजेश टोपे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- आर. आर. आबा यांनी विकासाच्या दृष्टीने कधीही एका प्रदेशाचा विचार न करता कायमस्वरूपी संपूर्ण राज्याचा विचार केला. मराठवाड्यात तर त्यांनी किती तरी वेळा दौरे केले. प्रत्येक वेळी त्यांनी या भागाच्या विकासासाठी काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न केला.
समर्थ साखर कारखान्याच्या कार्यक्रमासाठी तसेच माझ्या प्रचारासाठीही ते अनेक वेळा धावून आले. त्यांच्या वागण्यात कायम एक आपलेपणा होता. मला त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. जिल्ह्याच्या विकासासाठी मी ज्या ज्या गोष्टींची मागणी केली त्यांनी त्यास सहकार्य केले. आज केंद्र स्तरावरील अनेक योजना सुरू आहेत त्याचा पाया आबांनी महाराष्ट्रात रचला. मग ती संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान असो, महात्मा गांधी तंटामुक्त योजना असो की यशवंत ग्रामसमृद्धी अभियान असो, असे अनेक महत्त्वाचे उपक्रम त्यांनी ग्रामविकासमंत्री असताना सुरू केले. त्याचे राज्यात खूपच चांगले परिणाम दिसून आले.
महाराष्ट्र पोलिस दलासाठी आबांनी मोठे काम केले. पारदर्शक पोलिस भरती हा त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगता येईल. त्यांच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील हजारो युवकांना न्याय मिळाला.
(शब्दांकन : कृष्णा तिडके, जालना)

आम्हा तिघांची.. बुटक्या लोकांची पार्टी
आर. आर. आबा, डॉ. राजेंद्र शिंगणे आणि मी अशा आमच्या तिघांचीही उंची कमी होती. भाषण करताना समोर डायस असेल तर आम्हाला कायम चौरंग घ्यावा लागतो. आम्ही तिघे एकत्र आलो तर आबा नेहमी ‘आमची बुटक्या लोकांची पार्टी’ असे मिश्कीलपणे म्हणायचे. तेव्हा कितीही गंभीर वातावरण असले तर आम्ही सर्वच खळखळून हसायचो.