आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tributes Paid To Vilasrao Deshmukh On First Death Anniversary

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठवणींच्या गर्दीने आसवांचे बांध फुटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रथम स्मृतिदिनामित्त लातूरकरांच्या मनात आठवणींनी गर्दी केली. विकासाची गंगा लातुरात आणण्यासाठी भगीरथ प्रयत्न केलेल्या आपल्या लाडक्या नेत्याला बुधवारी बाभळगावी त्यांच्या समाधिस्थळी जाऊन हजारो नागरिकांनी साश्रुपूर्ण नयनांनी श्रद्धांजली वाहिली. सुख-दु:खात सावलीसारखी सोबत करणारा आपला आधार आपणास पोरका करून गेला ही जाणीव असह्य झाल्याने अनेकांना आपल्या अश्रूंचे बांध आवरता आले नाहीत.लातूरसह उस्मानाबाद, नांदेड, बीड, औरंगाबाद येथील विलासरावांचे चाहतेही उपस्थित होते. पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहर व जिल्ह्यात विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले.

आपला लाडका अन् हसतमुख नेता आपणास कधी रडवेल, असे लातूरकरांना स्वप्नातही वाटले नव्हते. परंतु अनिश्चित इतके निश्चित काहीही नसते, नियतीच्या या नियमाने 14 ऑगस्ट 2012 रोजी लातूरकरांच्या विश्वासावर कुरघोडी केली. विलासरावांना देवाघरी जाऊन वर्ष लोटले पण त्यांनी समाजमनात मिळवलेले स्थान अन् मान चिरंतन असल्याची साक्ष त्यांच्या समाधीस्थळी लोटलेल्या गर्दीने अन् लोकनयनात दाटलेल्या आसवांनी करून दिली.

या अभिवादन कार्यक्रमास आमदार दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, रितेश, धीरज, वैशालीताई, आदिती, जेनेलिया, दीपशिखा देशमुख, खासदार जयवंत आवळे, आमदार वैजनाथ शिंदे, आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, पोलिस अधीक्षक बी.जी. गायकर, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने संघाच्या कार्यालयात अशोक चिंचोले यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली वाहण्यात आली. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात राष्ट्रसंत भय्यू महाराज यांचे विलासरावांच्या जीवनकार्यावर व्याख्यान झाले.