आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकखाली सापडलेली महिला आश्चर्यकारकरीत्या बचावली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिडकीन - बस-ट्रकच्या अपघातानंतर ताबा सुटलेल्या ट्रकखाली सापडून बिडकीन येथील एक महिला आश्चर्यकारक बचावल्याची घटना बिडकीन येथे सोमवारी घडली.

सोमवारी दुपारी एक वाजता बिडकीन येथील एसजेपी पेट्रोल पंपावर पैठण-जळगाव ही बस(एम एच-20 बीएल 2841) इंधन भरून पेट्रोल पंपातून बाहेर पडत असताना पैठणहून औरंगाबादकडे भरधाव जाणार्‍या ट्रकने (एमएच-20 डब्ल्यू 8217) बसला जोरात धडक दिली. या अपघातात बसच्या काचा फुटल्या परंतु कुणाला इजा झाली नाही. परंतु अपघातानंतर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला व दरबार सोप समोरील इलेक्ट्रिक खांबाला धडक दिली. यामुळे पोलच्या तारा तुटल्या. याच दरम्यान लगतच्या प्रकाशनगरमधून कमलाबाई नितनवरे या दरबार सोपमध्ये कामावर पायी चालल्या होत्या. ट्रक आपल्या अंगावर येत असल्याचे पाहून त्या रस्त्यालगतच्या नालीमध्ये पडल्या. पाठोपाठ ट्रकसुद्धा नालीमध्ये घुसला. ट्रकच्या दोन्ही चाकांमध्ये ती महिला अडकली. खाली खड्डा असल्याने महिलेला फारशी इजा झाली नाही.

परिसरातील नागरिकांनी खड्डे खोदून महिलेस बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर ट्रकचालकाने पळ काढला. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले व वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे दैव तारी त्याला कोण मारी याचा अनुभव बिडकीनकरांना आला.