आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निष्पापांचे बळी: सुसाट वेगामुळे ११ जण ठार, क्रुझर-ट्रकची समोरासमोर टक्कर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- सकाळी रस्ता मोकळा असल्याचे पाहून भरधाव वेगाने निघालेल्या क्रुझर जीप व ट्रकची समोरासमोर टक्कर होऊन जीपमधील ११ जण ठार तर २ जण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता लातूर-नांदेड मार्गावर चाकूरजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन महिला व एका बालकाचाही समावेश आहे.

अहमदपूरहून १३ प्रवासी घेऊन लातूरकडे भरधाव वेगाने निघालेली क्रुझर (एमएच २४ व्ही ७६३८) चाकूर शहराजवळील अलगरवाडी येथील साई ढाब्याजवळ पोहोचली असता तशाच भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने येणारा ट्रक (एमपी २२ एच २२०) समोरासमोर एकमेकांवर धडकले. त्यात जीपच्या समोरील भागाचा चुराडा झाला व आतील प्रवासी चेंगरले. पहाटे फिरण्यासाठी आलेले नागरिक व हाॅटेलमधील मुलांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. ही माहिती शहरात पसरताच अपघातस्थळी बघ्यांची गर्दी उसळली. पोलिसही तत्काळ घटनास्थळी पोहोचले.

जीप आणि ट्रक या दोन वाहनांची धडक जोराची होती. वाहनांचे पत्रे एकमेकांत घुसल्याने ती वेगळी होत नव्हती. जीपचा पुढचा व मधला भाग पुरता चेपला गेल्याने मृतदेह जीपबाहेर काढणे मुश्किल झाले होते. शेवटी पोकलेन मशीन बोलावण्यात आली व तिच्या साह्याने जीप ट्रकपासून वेगळी करण्यात आली. जीपच्या काचा फोडण्यात आल्या. नागरिक व पोलिसांनी मृतदेह अक्षरश: ओढून काढले. त्यानंतर ट्रॅक्टरने ते ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शी व पोलिस कर्मचारी एच. ए. तिघिले यांनी सांगितले.

विश्वासाने बसले, जीवाला मुकले
क्रुझरमध्ये एकूण १३ प्रवासी होते. वेळेवर बस नसल्याने लातूरला लवकर पोहोचता येईल
म्हणून ते सर्वजण विश्वासाने बसले होते. पण काळाने त्यांच्यावर घाला घातला. ट्रक एवढ्या जोरात धडकला की जीपचालकासह समोरील व मधल्या सीटवरील १० प्रवासी चेंगरून जागीच ठार झाले.

मृतांची नावे
नागोराव दादाराव फावडे (३८, लासोना, जि. लातूर) नामदेव मारुती शेळके (२७), विजयकुमार शंकर रावते (२८) (दोघे रा. नांदगाव, जि. लातूर) नागनाथ बालाजी केसाळे (२५, नागेशवाडी, जि. लातूर), अनिता सुधाकर कोपरकर (३५, उजनी, जि. लातूर) जीपचालक अमोल भालचंद्र नागरगोजे (२५, दवणगाव, जि. लातूर) दत्ता हुलाप्पा शेंडगे (६०, पोलिसवाडी, जि. नांदेड) प्रशांत शिवाजी पवार (३०), अश्विनी प्रशांत पवार (२७), श्वेता प्रशांत पवार (२) (सर्व रा. तावशीगड, जि. उस्मानाबाद), धनंजय रंगराव कदम (५५, महाळुंब्रा, जि. लातूर)