जालना- भोकरदनकडून जालन्याकडे येणाऱ्या ट्रकचा विद्युत तारांना स्पर्श झाला यामुळे ट्रकच्या समोरील भाग जळाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. भोकरदन रस्त्याचे सध्या काम सुुरू असल्याने रस्त्याची उंची वाढली आहे. मात्र, महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात हद्द कुणाची यावरच खल सुरू असल्याने उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे हा प्रकार घडला.
जालना ते भोकरदन या मुख्य रस्त्यावरून जुन्या औद्योगिक वसाहतीला विद्युत पुरवठा करण्यासाठी ३३ केव्हीचे केबल गेलेले आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्याची उंची जवळपास दीड मीटरने वाढली. दरम्यान, या तारांना शुक्रवारी भोकरदनकडून जालन्याकडे येणाऱ्या ट्रकचा (एम.पी.०९ ए.एच.३९७५) स्पर्श झाला. त्यामुळे ट्रक जळाला असून चालक भाजला आहे. शासकीय गोदामाजवळ चार वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सध्या जालना ते भोकरदन रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून नूतनीकरणाने वेग घेतला आहे. त्यामुळे काही ठिकाणी विद्युत पुरवठा करणारे आठ विजेचे पोल हे रस्त्याच्या बाजुलाच आहेत. त्यामुळे उंची वाढल्याने मालवाहू ट्रक, एसटी बस यासारख्या वाहनांचा सहजपणे या तारांना स्पर्श होऊ शकतो. या संदर्भात रस्त्याच्या कंत्राटदाराने महावितरण कंपनीकडे निवेदन दिले आहे. मात्र, हद्दीचा मुद्दा उपस्थित झाल्याने या खांबांची उंची वाढविण्याकडे वेळो वेळी दुर्लक्ष झाले.
भोकरदन रोडवर ट्रकचा समोरचा भाग जळून चालक जखमी झाला.