आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहलक्ष्मीचे महालक्ष्मीला साकडे, प्रशासनास बुद्धी दे; पुजाऱ्यांनीही दिले निवेदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर- येत्या ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवामध्ये प्रशासनाविरोधात तुळजापूरकर, असा थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत. भाविकांना महाद्वारातूनच प्रवेश द्यावा, या मागणीवर जितके तुळजापूरक ठाम आहेत, तितकेच प्रशासनही घाटशीळमार्गेच प्रवेश देण्यावर अडून बसले आहेत. हा वाद घराघरांत पोहोचला आहे. किंबहुना, महालक्ष्मीसमोरही गाऱ्हाणे मांडून तुळजापुरातील गृहलक्ष्मींनी प्रशासनाचा निषेध केला आहे. सुदर्शनी बोधले यांनी महालक्ष्मीसमोर साकारलेल्या देखाव्याने तर प्रशासनाला सूचक इशाराच दिला आहे.

तुळजापुरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. पुजारी, व्यापारी वर्गासाठी व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले यात्राकाळातील काही दिवस प्रशासनाच्या नव्या धोरणामुळे अडचणीचे ठरले आहेत. तीन वर्षांपूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेपासून मंदिर प्रशासन अलर्ट झाले आहे. नवरात्रोत्सवातील गर्दी विचारात घेऊन प्रशासनाने गेल्या वर्षीपासून या काळात मंदिरात प्रवेश देण्याचा मार्ग बदलला. व्यापारी लाइन सोडून मागच्या मार्गावरून प्रवेश देण्याच्या प्रशासनाच्या या निर्णयाचा तुळजापूरकरांनी कडाडून विरोध केला आहे. हा विरोध आता अशा प्रकारे उमटून येत आहे.

प्रशासनास समजेल का?
प्रशासनाची भूमिका घाटशीळमार्गे प्रवेश देण्यावर ठाम असली तरी तुळजापूरकर या निर्णयाविरुद्ध आहेत. त्यामुळेच वेगवेगळ्या मार्गाने निषेध सुरू आहे. प्रशासनाच्या मार्गामुळे बसणाऱ्या फटक्याची शहरातील कुटंुबातील महिलांनाही जाणीव आहे. पण हे प्रशासनास समजेल का?

चार दिवस तयारी
सुदर्शनी बोधले यांनी यापूर्वी चारा छावणी, वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ला, शिवराज्याभिषेक सोहळा, सीतेचे अपहरण आदी प्रकारचे देखावे सादर केले होते. १० जण चार दिवस देखाव्याच्या तयारीत होते.

असा आहे देखावा
सुदर्शनी बोधले यांनी घरातील महालक्ष्मीसमोर हुबेहूब महाद्वाराची रांगोळी काढली आहे. बंद काळातील दुकाने, तुळजापूरकरांनी काढलेला मोर्चा, प्रशासनाच्या विरोधात युवा सेनेने केलेले उपोषण, प्रशासनाच्या निषेधाचे फलक, असे चित्र उभे केले आहे. संपूर्ण घर देखाव्याने व्यापले आहे.

तुळजापूर मंदिरातील प्रवेशद्वाराच्या मार्गावरून वादंग उठलेले असतानाच हा देखावा प्रशासनासह सर्वांचे लक्ष वेधणारा ठरला.

महानिरीक्षकांकडून सुरक्षेचा आढावा
कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील शुक्रवारी (दि. ९) तुळजापुरात आले होते. त्यांनी मंदिराच्या सुरक्षेची माहिती घेऊन मार्गदर्शक सूचना केल्याचे समजते. दरम्यान, व्यावसायिकांचे शिष्टमंडळ त्यांना भेटले. गाऱ्हाणे त्यांनी महानिरीक्षकांसमोर मांडले.
बातम्या आणखी आहेत...