आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापुरात महाराष्ट्रातील पहिले धर्मपीठ; पुजाऱ्यांना पारंपरिक वेशभूषा बंधनकारक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांना धार्मिक शिक्षण देण्यासाठी लवकरच काशी-वाराणसीच्या धर्तीवर राज्यातील पहिल्या धर्मपीठाची स्थापना होणार आहे. येथील पुजाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात येत असून त्यात धर्माचे संस्कार, नियम, देवीचे माहात्म्य, वेद, उपनिषदे व योगाचे धडे मिळणार आहेत.

जिल्हाधिकारी तथा संस्थानचे अध्यक्ष प्रशांत नारनवरे यांनी ही माहिती दिली. देवीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. मात्र, त्याला शास्त्रीय आधार नाही. नव्या पिढीतील पुजाऱ्यांना देवीचा इतिहास शिकवला जाईल आरि ते भाविकांना माहिती देऊ शकतील. तुळजाभवानी मातेला ऐतिहासिक वारसा आहे. नव्या पिढीला वर्षभरातील धार्मिक विधी, पूजा-पाठ, संस्कार, देवीचा इतिहास कळेल. त्यामुळे पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
तो वारसा पुढे आणण्याचे काम धर्मपीठाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. पुजाऱ्यांसोबतच इच्छुक असलेल्या भाविकांनाही धार्मिक शिक्षण देण्यात येईल. या संस्कार पीठामुळे तुळजापुरातील चित्र बदलेल.

-डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष , तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर
भाविकांना प्रशिक्षण देणार

पुजाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी काशीच्या धर्मपीठातील अभ्यासकांना तुळजापुरात बोलावले जाईल. भाविकांनाही हे शिक्षण घेता येईल. पूजा-विधी पारंपरिक असतील. देवीचे माहात्म्य पुस्तकरूपाने आणण्यात येत आहे.

धोतर-पंचा नेसणे सक्तीचे
पुजाऱ्यांना धोतर-पंचा हाच पारंपरिक वेश परिधान करण्याच्या संस्थानच्या सूचना आहेत. त्यानुसार शुक्रवारपासून आता सर्व पुजारी पारंपरिक वेशामध्ये दिसतील.

5000 एकूण पुजारी
2000 पुजाऱ्यांची एकूण कुटुंबे
3500 तरुण पुजारी

काय असते धर्मपीठ?
धर्मपीठाला अध्यात्मात महत्त्वाचे स्थान आहे. या धर्मपीठामध्ये धार्मिक शिक्षण दिले जाते.
या ठिकाणी पूजा-पाठ, चार वेद, उपनिषदे, धार्मिक विधींचे अध्ययन, अध्यापन केले जाते.

पैठणमध्ये होते धर्मपीठ
महाराष्ट्रात शंकराचार्य यांचे करवीर (कोल्हापूर) येथे एक धर्मपीठ आहे. पैठण (जि. औरंगाबाद) येथे एक धर्मपीठ होते. १२ व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांसह निवृत्ती, सोपान आणि मुक्ताई या भावंडांना शुद्धिपत्र घेण्यासाठी आळंदीहून पैठणला यावे लागले होते.