आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापुरात लाखावर भाविक; आज होणार नवरात्रोत्सवाची सांगता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या महिषासुरमर्दिनी रूपाचे शुक्रवारी (दि. २२) एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. दरम्यान, शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त सकाळी १० वाजता वैदिक मंत्रोच्चारात अग्निस्थापना करण्यात आली. शनिवारी (दि. २३) दुपारी १२ वाजता अग्निकुंडात पूर्णाहुतीने शाकंभरी नवरात्राची सांगता होईल. शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेदिवशी सकाळच्या अभिषेक पूजेनंतर देवीला महावस्त्र अलंकार घालण्यात येऊन देवीची महिषासुराचा वध करतानाची पूजा मांडण्यात आली. त्यानंतर धुपारती होऊन अंगारा काढण्यात आला.
देवीचे महिषासुरमर्दिनी रूप भाविकांना दर्शनासाठी सायंकाळच्या अभिषेक पूजेपर्यंत ७ वाजेपर्यंत खुले होते. तत्पूर्वी पहाटे ५ वाजता चरणतीर्थ होऊन नित्योपचार पूजेनंतर देवीदर्शनास प्रारंभ करण्यात आला, तर सकाळी ७ वाजता देवीच्या अभिषेक पूजेस प्रारंभ करण्यात आला. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर रात्री १०.३० वाजता संबळाच्या कडकडाटात आई राजा उदो उदोच्या जयघोषात छबिना मिरवणूक काढण्यात आली.

दरम्यान, शुक्रवारी (दि.२२) सकाळी १० वाजता गणेशओवरी येथे वैदिक मंत्रोच्चारात अग्निप्रज्वलन करण्यात आले. या वेळी मुख्य यजमान प्रा. धनंजय लोंढे सपत्नीक उपस्थित होते, तर शासकीय उपाध्ये बंडू पाठक, मकरंद प्रयाग, श्रीराम अपसिंगेकर, निलोत्तम जेवळीकर, भालंचद्र पाठक, राजेश अंबुलगे, धनंजय पाठक, सुधाकर कांबळे, सुनील लसणे आदी ब्राह्मवृंदांनी सप्तशती हवन, तुळजा सहस्रनाम, भवानीशंकर सहस्रनामाचे वाचन केले. शनिवारी (दि.२३) शाकंभरी पौर्णिमादिनी दुपारी १२ वाजता वैदिक मंत्रोच्चारात अग्निकुंडात मुख्य यजमान प्रा. धनंजय लोंढे यांच्या हस्ते पूर्णाहुती देऊन घटोत्थापनेने नवरात्राची सांगता होईल. भक्तांच्या हाकेला मदतीसाठी लगेच धावून येणारी त्वरिता, तुळजाभवानी सती अनुभूती व स्वर्गातील देवीदेवतांच्या मदतीला धावून आली. भवानी साक्षात पार्वतीचा अवतार असलेली तुळजाभवानी माता युद्धाची देवता, जगतजननी, विश्वपालनी, दैत्यराज महिषासुराचा वध केला व सर्व देवीदेवतांना सुख व स्वर्गप्राप्तीचा आनंद मिळवून दिला. म्हणून तुळजाभवानीची महिषासुराचा वध करतानाची पूजा मांडतात.