आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tuljabhavani Donation Irrigularity: File Purposal Lost

तुळजाभवानी दानपेटी गैरव्यवहार: मंत्रालयातूनच प्रस्ताव गहाळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्याम येत असलेल्या लेखा परीक्षणातही तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सिंहासन दानपेटीच्या गैरव्यवहाराला दुजोरा मिळाला आहे. यामुळे तुळजाभवानी मंदिरातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी सीआयडीने गृहसचिवांकडे सदरील कालावधीतील अधिका-यांच्या चौकशीच्या परवानगीसाठी दाखल केलेला अर्ज व प्रश्नावली गृहसचिवालयातून गायब झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सीआयडीला नव्याने हा प्रस्ताव दाखल करण्यास सांगण्यात आले आहे.हा सर्व प्रकार खालपासून वरपर्यंत सर्वत्र मिलीभगत असल्याचे चित्र दिसत असून त्यातून लाखो भाविकांच्या श्रद्धेवर दरोडा घालण्याचे काम अद्यापही सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन दानपेटी लिलावाद्वारे ठेकेदाराकडे देण्याची प्रक्रिया मंदिर संस्थानच्यावतीने राबवण्यात येते. यात भाविकांकडून दानपेटीत टाकण्यात येणारी रोख रक्कम ठेकेदाराला व इतर सोने, चांदी व कोणत्याही वस्तू मंदिर संस्थानकडे जमा होणे बंधनकारक आहे. परंतु, हा नियम पाळला जात नसून मंदिर संस्थानचे पदाधिकारी व ठेकेदार मिळून दानपेटीतील मौल्यवान वस्तू लंपास करत असल्याची तक्रार लातूरच्या सहधर्मादाय आयुक्तांकडे चार वर्षापूर्वी दाखल करण्यात आली होती. धर्मादाय आयुक्तांनी केलेल्या पाहणीत मोठ्या प्रमाणात मौल्यवान वस्तू व रोख रक्कम जमा होत असताना ती कमी दाखवून लूट होत असल्याचे समोर आले होते.

२२ जिल्हाधिकारी चौकशीच्या रडारवर
विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात १९९१ ते २०१० या कालावधीतील स्थानिक मंदिर संस्थानशी निगडित अधिका-यांचा थेट सहभाग अथवा या प्रकरणात मूक संमती असल्याचे या अहवालातून दिसून येते. यात त्याकाळातील २२ जिल्हाधिका-यांचा समावेश आहे. सीआयडीने वर्षभरापूर्वी तपासाच्या अनुषंगाने या कालावधीतील अधिका-यांच्या चौकशीसाठी गृहसचिवांकडे परवानगी मागून एक प्रश्नावली गृहसचिवालयाकडे सादर केली होती. परंतु ही कागदपत्रे सचिवालयातून गायब झाल्याचे वृत्त आहे. नव्याने मागणी करा, तत्काळ परवानगी मिळेल असा अलिखित आदेश गृहसचिवालयातून सीआयडीला देण्यात आल्याचे कळते.

भाविकांत नाराजी
दान केलेल्या दागिने, गायब झाल्याने त्याची सखोल चौकशी करण्याची भाविकांची मागणी होती. पण ती होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

चौकशीत गांभीर्य नाही: मंदिर संस्थानच्या गेल्या २० वर्षांतील कारभाराच्या लेखा परीक्षणासाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिका-याची विशेष लेखा परीक्षक म्हणून नेमणूक झाली होती. या अधिका-याने अहवालात मंदिरातील अनागोंदी व लुटीचा पर्दाफाश केला होता. त्यामुळे याप्रकरणी राज्य शासन गांभीर्याने कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सिंहासन पेटीच्या चाव्या कोणाकडे, रेकॉर्डच नाही
विशेष लेखा परीक्षकांनी आपल्या अहवालात अनेक गंभीर मुद्यांवर बोट ठेवले असून याबाबत अनेकदा यापूर्वीच्या शंका उपस्थित करूनही कोणतीच दखल घेतली नसल्याचे म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मंदिरातील सिंहासनपेटीच्या चाव्या कोणाकडे असतात याबाबत कोणतेच रेकॉर्ड उपलब्ध नाही. याबाबत अनेकवेळा विचारणा करुनही चाव्या कोणाकडे असतात
हे मंदिर व्यवस्थापन सांगू शकले नाही. लिलावातील अटीनुसार सदरील चाव्या मंदिर संस्थान प्रशासनाकडे राहतील असे नमूद असताना पेटीला सील कोण करते, ती कोण उघडते, तसेच पेट्या उघडताना मंदिर प्रतिनिधी कोण याबाबतही माहिती नसून उपलब्ध माहितीनुसार वर्ग ४ कर्मचा-यांच्या नावे आदेश आहेत. यावरूनच या महत्त्वपूर्ण बाबीकडे जाणीवपूर्वक , विशिष्ट हेतूने कानाडोळा केल्याचे दिसून येते.