आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आई राजा उदो उदो’च्या गगनभेदी जयघोषात नवरात्रोत्सवाची सांगता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - ‘आई राजा उदो उदो’च्या गगनभेदी जयघोषात सोमवारी (दि.१०) महानवमीदिनी दुपारी १२ वाजता होमकुंडावरील अजाबलीनंतर मंदिरातील घटोत्थापनाने नवरात्रोत्सवाची सांगता झाली. या वेळी लाखो भक्तांची हजेरी होती.
या वेळी होमकुंडाभोवती तगडा पोलिस बंदोबस्त होता. सायंकाळी नगरच्या पलंगपालखीचे शहरात आगमन झाले. सकाळपासूनच शहरातील प्रमुख मार्गांवरून सिंदफळ येथील मानकरी गजेंद्र लांडगे यांचा मानाचा बोकड वाजतगाजत मंदिरात आणण्यात आला. दुपारी १२ वाजता तहसीलचे शिपाई जीवन वाघमारे यांनी होमकुंडावर अजाबलीचा धार्मिक विधी पार पाडला. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दीपाली घाडगे, सहायक पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन, पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे आदी पोलिस दलासोबत तैनात होते.
होमकुंडावरील धार्मिक विधीनंतर देवीचा मंदिरातील घट उठविण्यात आले. त्यानंतर त्रिशूल येमाई खंडोबा मंदिर, मातंगी मंदिरातील घट उठविण्यात येऊन नवरात्रोत्सवाची सांगता झाली. मंदिरातील घटोत्थापनेनंतर घरोघरी बसविण्यात आलेले घट उठवून मागील ९ दिवसांच्या उपवासाची सांगता झाली.
तत्पूर्वी सायंकाळी अभिषेक पूजा लवकरच संपविण्यात आली. पूजेचे मानकरी दत्तात्रय कदम, महंत तुकोजीबुवा आदींसह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
महानवमीदिनी वर्षातून केवळ एकदा मंदिर रात्रभर उघडे : दरम्यान, सोमवारी तुळजाभवानी मंदिर रात्रभर उघडे ठेवण्यात आले. वर्षभरात केवळ आजच्या दिवशी मंदिर रात्रभर उघडे ठेवण्यात येते. तसेच सोमवारी सायंकाळी ७ वाजेची अभिषेक पूजा रात्री १२ वाजता करण्यात येते.
आज सूर्याच्या पहिल्या किरणात सीमोल्लंघन सोहळा
मंगळवारी (दि. ११) पहाटे उगवत्या सूर्याच्या पहिल्या किरणात कुंकवाच्या मुक्त उधळणीत तुळजाभवानी देवीचा सीमोल्लंघन सोहळा पार पडेल. या वेळी देवीची मूर्ती १०८ साड्यांमध्ये गुंडाळून भिंगारच्या पालखीतून मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करते. सीमोल्लंघन सोहळ्यानंतर तुळजाभवानीदेवी नगरच्या पलंगावर सिंह गाभाऱ्यात विसावते. येथून देवीच्या ५ दिवसांच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होईल. त्यानंतर सोमवारी (दि. १६) पहाटे मंचकी निद्रा संपवून सिंहासनावर विराजमान होईल.
बातम्या आणखी आहेत...