आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर कटारे मिलचा भोंगा बंद, तुळजापूर तालुक्यातील तामलवाडीतील 1500 कामगार बेरोजगार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तामलवाडी - तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी परिसरातील अनेक कुटुंबांचा आधार असलेली येथील कटारे स्पिनिंग मिल महिन्यापासून बंद पडली आहे. यामुळे सुमारे १५०० कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कापसाचे भाव गगनाला भिडल्यामुळे ही कंपनी बंद करण्यात
आली आहे.
तामलवाडी पंचक्रोशीत वरदायिनी ठरलेल्या कटारे स्पिनिंग मिलला सध्या घरघर लागल्याची परिस्थिती आहे. मराठवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी म्हणजेच तामलवाडीजवळ ३५ वर्षांपूर्वी कटारे स्पिनिंग मिलची सोलापूरच्या कटारे उद्योग समूहाने स्थापना केली होती. सुरुवातीच्या कालावधीमध्ये या कटारे स्पिनिंग मिलमध्ये तीन शिप्टमध्ये एक हजार ५०० हजार कामगार काम करत होते. त्यामुळे या परिसरात आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर वाढली होती. अनेकांच्या हाताला काम मिळाल्यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक दूरवरच्या गावातील लोकही कामासाठी तामलवाडी परिसरात येऊन स्थायिक झाले हाेते. मात्र, आता सर्व परिस्थितीमध्ये बदल होत आहे. कंपनीचे पूर्वीचे वैभव राहिलेले नाही.
कंपनीचा उद्योग आतबट्ट्याचा होत असल्यामुळे पाच-सहा वर्षांपासून कटारे स्पिनिंग मिलला उतरती कळा लागत चालली आहे. तेव्हापासून टप्प्याने कंपनीने एक – एक विभाग बंद करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शेवटच्या टप्प्यात सुतगिरणीमध्ये केवळ ३०० कामगार उरले. १२०० कामगार यापूर्वीच बेरोजगार झाले आहेत. आता तर एक महिन्यापासून पूर्णपणे मिल बंद करण्यात आली आहे. यामुळे उर्वरित ३०० कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. सध्या खरीप हंगामातील सुगीचे दिवस असल्यामुळे कामगारांना तात्पुरते काम मिळाले आहे. मात्र, सुगीचे दिवस संपल्यानंतर कामगारांवर पुन्हा उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे कटारे समूहाने ही गिरणी पूर्ववत सुरू करण्याकडे कामगारांचे डोळे लागले आहेत.
कापसाचे भाव वाढल्यामुळे तसेच कापूस वेळेवर मिळत नसल्यामुळे सुताचे उत्पन्न निघणे कठीण झाले आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कापसाचा दर ४८ हजार रुपये प्रतिटन झाल्यामुळे कंपनी तोट्यात सुरू होती.
बातम्या आणखी आहेत...