आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुळजाभवानी मंदिराच्या स्वच्छतेसाठी सरसावले शेकडो हात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या लौकिकात वाढ व्हावी यासाठी भाविकांना सेवा-सुविधा पुरवण्यासोबतच मंदिराचे पावित्र्य आणि स्वच्छता अबाधित राखणे गरजेचे आहे. देवीची सेवा म्हणून प्रत्येकानेच स्वच्छतेची जबाबदारी उचलण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी शनिवारी (दि.5) तुळजाभवानी मंदिराचा परिसर धुऊन स्वच्छ केला. त्यांच्यासोबत 60 ते 70 जण स्वच्छतेच्या कामात सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी महाद्वाराजवळील भक्त निवासात पुजारी वर्गाशी चर्चा केली. या वेळी मंदिर संस्थानचा नावलौकिक वाढवण्यासंदर्भात पुजार्‍यांकडून सूचना मागवल्या. या वेळी प्रा. संभाजी भोसले, नगरसेवक नागनाथ भांजी आदी पुजार्‍यांनी काही सूचना मांडल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी तुळजाभवानी मंदिराची परिक्रमा केली. टोळोबा मंदिरापासून परिक्रमेला सुरुवात करण्यात आली. दर्शन मंडपाच्या पायथ्यामार्गे आराधवाडी, आराधवाडीतून भारतीबुवा मठ मार्गापासून भीमनगरात प्रवेश केला. मातंगी मंदिरातून राजमाता जिजाऊ महाद्वाराजवळ परिक्रमेची सांगता झाली. राजे शहाजी महाद्वारापासून मंदिराच्या स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली. दोन्ही महाद्वारे, कल्लोळ, गोमुख परिसर स्वच्छ केल्यानंतर निंबाळकर प्रवेशद्वारासह मंदिरात सर्वत्र स्वच्छता करण्यात आली.

नवरात्रीसाठी पुजार्‍यांनी सुचवले काही बदल
या वेळी भाविकांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला. पुजारी वर्गाशी चर्चा करताना जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी आगामी नवरात्रोत्सवातील कार्यक्रमाची रूपरेषा समोर मांडली. तसेच नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमाविषयी पुजार्‍यांनी काही बदल सुचवले आहेत.