आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानपेटीवरच डल्ला मारणार्‍या ठेकेदारावर मंत्रालय मेहेरबान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - तुळजाभवानी मंदिरातील दानपेटीच्या गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी सुरू असतानाच विधी व न्याय मंत्रालयाने ठेकेदारास दीड कोटी रुपये देण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. मुदतीपूर्वीच ठेका बंद केल्याने नुकसान झाल्याची तक्रार ठेकेदाराने केली होती.
लाखो भाविकांची कुलस्वामिनी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात सिंहासन दानपेटीत संगनमताने गैरव्यवहार होत असल्याची बाब मार्च 2010 मध्ये उघडकीस आली होती. त्यामुळे ठेकेदाराचा ठेका रद्द करून वीस वर्षांतील ठेकेदारांची तसेच संबंधित अधिकार्‍यांची चौकशी सीआयडीमार्फत सुरू होती. यामध्ये ठेकेदार बापूराव आनंदराव कदम (सोंजी) यांचाही समावेश असताना विधी व न्याय मंत्रालयाने या ठेकेदारास त्यांच्या ठेक्याच्या नुकसानीपोटी 1 कोटी 21 लाख 58 हजार 854 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानच्या अध्यक्षांना कक्ष अधिकार्‍यांनी हे आदेश दिले असून हा आदेश काढण्यामागे एका उच्चपदस्थ राजकीय वरदहस्ताची जोरदार चर्चा आहे. तुळजाभवानी मंदिरात भाविकांकडून देविचरणी श्रद्धेपोटी रोख रक्कम, मौल्यवान दागिने, सोने, चांदी दान केले जाते. यासाठी मंदिराच्या गाभार्‍यात सिंहासन पेटी ठेवण्यात आलेली आहे. परंतु या दानपेटीत कमी रक्कम, कमी दागिने जमा होत असल्याचे भासवून संगनमताने ठेका घेऊन मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला जात असल्याची तक्रार तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी सन 2010 मध्ये जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्षांकडे केली होती. त्यानुसार धर्मादाय आयुक्तांकडून करण्यात आलेल्या तपासणीत ठेकेदार सिंहासन पेटीत जमा होणारे दागिने परस्पर लांबवत असल्याचे तसेच सिंहासन दानपेटीत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व मौल्यवान वस्तू अर्पण केल्या जात असताना त्या ठेकेदाराकडून लंपास केल्या जात असल्याची गंभीर बाब समोर आली. त्यामुळे सहधर्मादाय आयुक्तांनी 20 एप्रिल 2010 रोजी आदेश काढून लिलावासंदर्भातील करारनामा मुदतीपूर्वीच रद्द केला. त्याचबरोबर यासंदर्भात एक तक्रार राज्यशासनाकडेही करण्यात आल्याने तेव्हापासून याप्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी अद्याप सुरू आहे.

याप्रकरणी लिलाव मुदतीपूर्वीच रद्द करण्यात आल्याने नुकसान झाल्याचे सांगत ठेकेदार बापूराव कदम (सोंजी) यांनी विधी व न्याय मंत्रालयाकडे नुकसान भरपाईसाठी तक्रार अर्ज दिला होता. या अर्जानुसार विधी व न्याय मंत्रालयाच्या कक्षाधिकार्‍यांकडून काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाला एक फॅ क्स प्राप्त झाला आहे. यामध्ये लिलावधारकाचा करारनाम्यातील कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच सिंहासन दानपेटी ताब्यात घेतल्याने लिलावधारकास नुकसानीपोटी त्यांनी केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने उर्वरित लिलावाच्या कालावधीपोटी 203 दिवसांकरिता 1 कोटी 21 लाख 58 हजार 854 रुपये देण्याबाबत आदेश काढण्यात आले आहेत.

काय आहे आदेशात
तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन दानपेटी बापूराव आनंद कदम (सोंजी) यांनी 19 सप्टेंबर 2009 ते 7 ऑक्टोबर 2010 या कालावधीकरिता म्हणजेच 384 दिवसांसाठी लिलावात घेतली होती. यापोटी बापू कदम यांनी 2 कोटी 30 लाख 50 हजार रुपये मंदिर संस्थानकडे भरले होते. परंतु सहायक धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाने 20 एप्रिल 2010 रोजी म्हणजेच लिलाव कालावधीच्या 203 दिवस अगोदरच लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली. यामुळे लिलावातील बोलीपोटी त्यांचे प्रतिदिन 59 हजार 895 रुपये याप्रमाणे 1 कोटी 21 लाख 58 हजार 854 रुपयांचे नुकसान झाल्याचा निष्कर्ष विधी व न्याय मंत्रालयाने काढून ही रक्कम मंदिर संस्थानने ठेकेदार बापूराव कदम यांना देण्याबाबत 7 जुलै 2014 रोजी आदेश कक्ष अधिकार्‍यांनी काढले आहेत. सीआयडी चौकशीसह हे प्रकरण न्यायालयात सुरू असताना असा आदेश काढण्यासाठी नेमक्या कोणत्या नेत्याने वजन वापरले हा सध्या औत्सुक्याचा विषय बनला आहे.

दरवर्षी पाच कोटी रुपयांचा गैरव्यवहार !
10 वर्षांत केवळ 46 ग्रॅम सोने

लिलावातील अटी व शर्थीनुसार सिंहासन पेटीत जमा होणारी रोख रक्कम ठेकेदारास व मौल्यवान वस्तू मंदिर संस्थानकडे जमा करायच्या असे अपेक्षित होते. परंतु ठेकदाराने मौल्यवान वस्तू संस्थानकडे जमा केल्याच नाहीत. परिणामी 1999 ते 2009 या दहा वर्षांत केवळ 46 ग्रॅम, 700 मिलिग्रॅम सोने व 512 ग्रॅम व 500 मिलिग्रॅम चांदी दानपेटीत जमा झाली.

एका महिन्यात 31 लाखांचा ऐवज
संशय आल्याने सहायक धर्मादाय आयुक्तांनी 19 मार्च 2010 च्या सायंकाळी 6 वाजता ही दानपेटी ताब्यात घेऊन सील केली. त्यानंतर 32 दिवसांनी सील काढून मोजदाद करण्यात आल्यानंतर पेटीमध्ये रोख 23 लाख 13 हजार रुपये , 441 ग्रॅम सोने व 6 हजार 171 ग्रॅम चांदी असा एकूण 31 लाख 86 हजार रुपयांचा ऐवज जमा झाला. यावरून दरवर्षी देवस्थानचे पाच कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा निष्कर्ष सहायक धर्मादाय आयुक्तांनी अहवालामध्ये नोंदवून दानपेटी लिलाव रद्द करून पेट्या मंदिर संस्थानच्या ताब्यात दिल्या होत्या.

संगनमताने मिळवायचे ठेका
चंदर सोंजी, बाळकृष्ण कदम, धन्यकुमार क्षीरसागर, संभाजी कदम, अरुण सोंजी, संजय कदम, दगडोबा शिंदे, अजित कदम, आनंद धन्यकुमार क्षीरसागर, बापू आनंद सोंजी या ठेकेदारांनी 1991-92 ते 2009-10 या कालावधीत संगनमताने साखळी पद्धतीने ठेका मिळवल्याचे तपासातून पुढे आले आहे. यामध्ये प्रत्येकवेळी एकाच्या नावाने ठेका घेण्याचे निश्चित करून इतरांनी सहभाग नोंदवून प्रक्रियेसाठी स्पर्धा करायची. त्यानंतर दानपेट्यांतून मिळणारी रक्कम व मौल्यवान वस्तू वाटून घेतल्या जात असल्याचे तपासात नमूद केले आहे

अर्जदाराने प्रत दाखवली
यासंदर्भात अद्याप मूळ आदेशाची प्रत मिळालेली नाही, अर्जदाराने यासंदर्भातील विधी व न्याय मंत्रालयाची आदेशाची प्रत दाखवली आहे. या संदर्भात मी ऐकून आहे. परंतु प्रत मिळालेली नसल्याने मूळ प्रत येण्याची वाट पाहतोय. - डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष तुळजाभवानी मंदिर संस्थान