आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजाभवानीच्या रूपाचे दर्शन; देवीची रथ अलंकार पूजा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर- नवरात्रोत्सवाच्या पाचव्या माळेला, ललिता पंचमीला जगज्जननी तुळजाभवानी देवीचे रथात स्वार रूपाच्या दर्शनाने ४ लाख भाविक धन्य झाले. एका हातात घोड्यांचा लगाम तर दुसऱ्या हातात चाबूक घेतलेल्या शक्तिदेवता तुळजाभवानीच्या रूपाचे दर्शन सायंकाळी ७ वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले होते.

शनिवारी सकाळच्या अभिषेक पूजेनंतर दुपारी ११ वाजता देवीला महावस्त्र आणि अलंकार घालण्यात आले. त्यानंतर धूपारतीनंतर महंत तुकोजीबुवांनी ललिता पंचमीनिमित्त देवीची रथ अलंकार पूजा मांडली. श्री तुळजाभवानीस स्वर्ग, मृत्यू व पाताळ या तिन्ही लोकीच्या भ्रमणासाठी साक्षात सूर्यनारायणाने आपला अश्वरथ दिल्याची आख्यायिका सांगितली जाते.

तत्पूर्वी पहाटे १ वाजता चरणीतीर्थ होऊन तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला प्रारंभ झाला. तर सकाळी ६ वाजता देवीच्या अभिषेक पूजेला सुरुवात करण्यात आली. रात्रीच्या अभिषेक पूजेनंतर रात्री १०.३० वाजता देवीची छबिना मिरवणूक काढण्यात आली. पाचव्या माळेदिवशी ४ लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन आपला पारंपरिक खेटा पूर्ण केला. दिवसभर दर्शनमंडप भाविकांनी भरलेला होता. तर वाहनतळावरून टप्प्याटप्प्याने भाविकांना दर्शन मंडपात सोडण्यात येत होते. नवरात्रोत्सवामध्ये तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी पायी चालत येणाऱ्या भाविकांसाठी मार्गावर ठिकठिकाणी सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींच्याकडून मोफत अन्नदान करण्यात येत आहे. लातूर मार्गावर बाजार समितीजवळ व्यापारी संभाजी मुळे व आदित्य तपसाळे यांच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात येत आहे.