आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भवानीच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ, जागोजागी अन्नछत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- नवरात्रोत्सव सुरू होताच लातूर आणि परिसरातील गावांमधून आई भवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भाविकांची रीघ लागली आहे. लातूर-तुळजापूर हा अख्खा रस्ता भाविकांनी फुलून गेला आहे. जागोजागी अन्नछत्र, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील तुळजापूर हे आई भवानीचं शक्तिस्थान म्हणून ओळखलं जातं. लातूर ते तुळजापूर हे ७५ किमीचे अंतर चालत जाऊन भवानीचे दर्शन घेण्याची परंपरा गेल्या दहा-पंधरा वर्षांत सुरू झाली आहे. अलीकडच्या काळात तरुणांचे चालत जाऊन दर्शन घेण्याचे प्रमाण वाढले आहे. अंबाजोगाई, लातूर, अहमदपूर, उदगीर भागातील लोक लातूरपर्यंत वाहनाने येतात आणि मुख्य रस्त्यावरून तुळजापूरकडे पायी प्रयाण करतात. चालत जाणाऱ्या भाविकांसाठी या रस्त्यावर लहान-मोठी अन्नछत्रेही उभारण्यात आली आहेत. लातूरच्या काही व्यापारी मंडळींनी तुळजापूर रस्त्यावर सर्वात मोठे अन्नछत्र सुरू केले असून गेल्या पंधरा वर्षांपासून ते अविरत सुरू आहे. या भाविकांना सोबत पाण्याच्या बाटल्या बाळगणे सोयीचे नसल्यामुळे अनेकांनी जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. कुणी वाहनात मोठी टाकी ठेवून पाणी वाटप करताना दिसतो. नऊ दिवसांच्या काळात अनेकांचे उपवास असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी फराळाच्या पदार्थांचीही सोय करण्यात येते.
सुरक्षेचे आवाहन
पायी चालत जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे या रस्त्यावर भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. मात्र, पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून आवाहन करण्यापलीकडे फारशा काही उपाययोजना केल्या जात नाहीत. रत्नागिरी - नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे मोठ्या वाहनांची संख्या जास्त आहे. यापूर्वी पायी जाणाऱ्यांना मोठ्या वाहनांनी ठोकरल्याची आणि चिरडल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे भाविकांनी शक्यतो उजव्या बाजूने चालावे. रात्रीच्या वेळी चालू नये. शक्य झाल्यास हाताला रेडियमचे बँड बांधावेत, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
बातम्या आणखी आहेत...