आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tulzabhavani Temple Irrigularity : Pressure On Temple Members

तुळजाभवानी मंदिर गैरव्यवहार : मंदिर प्रतिनिधींवर दबाव टाकून पळवले दागिने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - तुळजाभवानी मंदिराच्या गाभा-यातील सिंहासन पेटीचा लिलाव घेणा-या ठेकेदारांकडून मंदिर प्रशासनाच्या प्रतिनिधींवर दबाव टाकला जात असे. तसेच काही कर्मचा-यांना सहभागी करून घेऊन दानपेटी उघडून श्रद्धेने देवीस अर्पण केलेल्या मौल्यवान दागिन्यांची लूट केली जात होती. हे संतापजनक सत्य सीआयडीच्या अहवालातून समोर येत आहे.


या गंभीर बाबीबाबत मंदिर प्रशासनाच्या कोणत्याही कर्मचा-याने वरिष्ठांकडे तक्रार केली नसल्याने हे संगनमत होते की ठेकेदारांचा दबाव, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 1991 ते 2010 या कालावधीत झालेल्या तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन दानपेटीच्या ठेकेदारीतील गैरव्यवहाराचा राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या आदेशावरून गेल्या दीड वर्षापासून गुन्हा अन्वेषण विभागामार्फत तपास सुरू आहे. या तपासानुसार सीआयडीने या कालावधीत सिंहासन पेटीचे लिलाव कोणी घेतले, लिलावातील अटी, शर्ती काय आहेत, त्या काळात मंदिर संस्थानचे असणारे अध्यक्ष, विश्वस्त, संस्थानच्या लेखा परीक्षणासंदर्भातील कागदपत्रे आदी ताब्यात घेऊन तपासणी केली आहे. तसेच ही तपासणी अद्यापही सुरू आहे. यासाठी त्यावेळचे मंदिर संस्थानचे कर्मचारी, ठेकेदार, साक्षीदार यांच्या जबाबासह गुप्त पातळीवरही चौकशी करण्यात आली. यातून अनेक गंभीर तसेच संतापजनक बाबी सीआयडीच्या समोर आल्याचे अहवालावरून दिसून येते. यामध्ये ठेकेदारांनी चक्क या प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचा-यांवर दबाव टाकून देवीस अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तू दानपेटी उघडून घेऊन गेल्याचे अहवालात नमूद केले आहे. यासाठी ठेकेदार व मंदिर प्रशासनाचे प्रतिनिधी खोलीचा दरवाजा बंद करून दानपेटी उघडत होते.


हे सर्व लिलाव ठेकेदार स्थानिक रहिवासी असून लिलाव घेतेवेळी ते दहा ते बारा जणांचा गट तयार करून एकाच्याच नावाने लिलाव घेत असत. लिलावाच्या अटी व शर्तीमध्ये दररोज सायंकाळी 6 वाजता लिलावधारक किंवा त्यांचा प्रतिनिधी व मंदिर प्रशासनाचे प्रतिनिधी यांच्यासह त्रयस्थ भाविकांना समोर घेऊन दानपेट्या उघडण्याची अट होती, परंतु प्रत्यक्षात मात्र बंद दरवाज्याआड कोणताही त्रयस्थ पंच न घेता ठेकेदारांचे इतर सहभागीदार प्रशासकीय प्रतिनिधींवर दबाव टाकून दानपेटी उघडून भाविकांनी मोठ्या श्रद्धेने वाहिलेल्या रोख रकमेसह मौल्यवान दागिने ठेकेदार घेऊन जात. एवढ्यावरच न थांबता स्वत:च्या सोयीनुसार पेटी उघडल्याबाबतचा पंचनामा करून त्यावर त्रयस्थ पंचाऐवजी स्वत:च्याच साथीदारांच्या अथवा सहभागीदारांच्या स्वाक्ष-या घेण्यात येत होत्या.


दागिने तर लुटलेच शिवाय लिलावाची रक्कमही भरली नाही
लिलावातील अटीनुसार ठेकेदाराने सिंहासन पेटीतील केवळ रोख रक्कम स्वत:कडे घेऊन मौल्यवान वस्तू मंदिर संस्थानकडे जमा करणे बंधनकारक होते. ठेकेदारांनी मंदिर संस्थानच्या मालकीचे दागिने तर लुटलेच, परंतु लिलावापोटी मंदिर संस्थानला देण्यात येणारी रक्कम पूर्णपणे अदा केली नाही. ही गंभीर बाब तपासणीतून समोर आल्यानंतर 2010 मध्ये ठेके रद्द करून दानपेट्या मंदिर संस्थानच्या ताब्यात घेण्यात आल्या. सद्य:स्थितीत लिलावधारकांकडे लाखो रुपये येणे आहेत. यामध्ये 2001-02 मध्ये संजय कदम यांनी एक कोटी 35 लाख रुपयांस दानपेटीचा लिलाव घेतला. यापैकी 13 लाख 50 हजार रुपये अद्याप देवस्थानला दिलेले नाहीत. 2003-04 मधील ठेकेदार अरुण सोंजी यांनी 50 हजार 100 रुपये अद्याप जमा केले नाहीत.


साखळी पद्धतीने ठेका
चंदर सोंजी, बाळकृष्ण कदम, धन्यकुमार क्षीरसागर, संभाजी कदम, अरुण सोंजी, संजय कदम, दगडोबा शिंदे, अजित कदम, आनंद धन्यकुमार क्षीरसागर, बापू आनंद सोंजी या ठेकेदारांनी 1991-92 ते 2009-10 या कालावधीत साखळी पद्धतीने ठेका बळकावून दानपेट्यांची लूट केल्याचे स्पष्ट होत आहे.