आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूर खरेदी घोटाळा प्रकरण; ७० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना -जिल्ह्यातील बहुचर्चित तूर खरेदी घोटाळाप्रकरणी अखेर शनिवारी ७० लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ४९ शेतकरी,१८ व्यापारी आणि १ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांकडून कमी दराने तूर खरेदी करून ती शेतकऱ्यांच्या नावे हमीभावाने विक्री करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी महिनाभरापूर्वीच अहवाल तयार करण्यात आला होता. मात्र तक्रार कोण देणार यावरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया थांबली होती. अखेर शुक्रवारी रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी २४ तासांत कुणालाही अटक करण्यात आली नव्हती.  

राज्यात यावर्षी तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले त्यामुळे बाजारात तुरीचे भाव काेसळले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू केले. यात नाफेडच्या मदतीने जिल्ह्यात जालनासह चार ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. या केंद्रांवर तुरीला ५०५० रुपये हमीभाव देण्यात आला. बाजारात ३३०० ते ३५०० रुपये दर असताना शेतकऱ्यांना मात्र हमीभाव केंद्रावर बाजारभावापेक्षा जवळपास दीड हजार रुपये वाढीव दर मिळाल्याने या केंद्रांवर तूर खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. या हमीभाव केंद्रावर बाजारभावापेक्षा अधिक दराने तूर विक्री केली जात असल्याने त्याचा व्यापाऱ्यांनीही फायदा करून घेतला. 
त्यासाठी शेतकऱ्यांकडून कमी दराने तूर खरेदी करून ती पुन्हा इतर शेतकऱ्यांच्या नावे हमी भाव केंद्रावर विक्री करण्यात आली. यात या व्यापाऱ्यांना काही कर्मचाऱ्यांनीही मदत केल्याचे समाेर आले आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनेचा काही व्यापाऱ्यांनी अशाप्रकारे लाभ घेऊन शासनाची फसवणूक केल्याचे समोर आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने याप्रकरणाची चौकशी करण्यात आली.   

त्यानुसार १९ डिसेंबर २०१६ ते १२ मे २०१७ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. यात १८ शेतकऱ्यांनी ४९ शेतकऱ्यांचा विश्वासघात करून त्यांच्या नावे तूर विक्री केली. यात ९२ लाख ५७ हजार ८५९ रुपयांची तूर नाफेडला विक्री करण्यात आली त्यातील ८४ लाख ९ हजार ८३३ रुपये आरटीजीएस च्या मदतीने संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावरून व्यापाऱ्यांच्या खात्यावर वळते केले आहेत.  सहायक निबंधक विष्णू रोडेंच्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक योगेश गावडे हे करीत आहेत.
 
 
११ हजार शेतकऱ्यांनी विकली तूर  
जालना येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नाफेडच्या वतीने तूर खरेदी करण्यात आली. यात ५ हजार ६०० शेतकऱ्यांनी ९२ हजार क्विंटल तूर विक्री केली. तर जिल्ह्यातील चारही हमी भाव खरेदी केंद्रांवर ११ हजार ३३२ शेतकऱ्यांनी १ लाख ७८ हजार क्विंटल तूर विक्री केली आहे. यात जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांचाही समावेश आहे.   
बातम्या आणखी आहेत...