आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीतील उलाढाल थंडावल्याने, हमाल-मापाडींवर आर्थिक संकट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- मराठवाड्यात सर्वाधिक आर्थिक उलाढाल होणाऱ्या बाजार समित्यांत जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव आवर्जून घेतले जाते. मात्र, सतत तीन वर्षांपासून पडत असलेल्या दुष्काळामुळे या बाजार समितीत मालाची आवक यंदा ५० टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. बाजार समितीतील दुष्काळाचा फटका हमाल, मापाड्यांनाही सहन करावा लागत असून एरवी ५०० रुपये कमविणाऱ्या हमालांना सध्या ५० रुपये रोजंदारीवर काम करण्याची वेळ आली आहेत.

कृषी उत्पन्न बाजारपेठेत गहू, ज्वारी, मका, सोयाबीन, तूर आदी पिकांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यामुळे शहरातील इतरही व्यवसाय तेजीत असतात. मात्र, सध्या तीन वर्षापासून होत असलेल्या अत्यल्प पावसामुळे शेतीमालाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे दिसून येत आहे. या उत्पादनात घट झाल्याने पर्यायाने कृषी उत्पन्न बाजार समितीत होणाऱ्या मालाची आवक निम्म्याने कमी झाली आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून किराणा मार्केट, कपडा बाजारपेठ, कृषी सेवा केंद्र, सराफा व्यापारपेठ यासोबत इतर व्यवसायांना त्याचा फटका बसला आहे. यावर्षी जून महिन्याच्या प्रारंभी समाधानकारक पाऊस झाला. यामुळे बाजारपेठेत चांगली खरेदी, िवक्री वाढून बाजारपेठेत चांगले वातावरण निर्माण झाले होते. मात्र, जूनच्या १५ तारखेपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. यामुळे एकप्रकारे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
काम थंडावले
मालाची आवक झाल्यानंतर माल वाहनातून उतरविणे अथवा वाहनात टाकण्याचे काम हमालांकडून करून घेतले जाते. मापाड्यांकडून धान्याची मोजमाप करून घेतले जाते. यामधून दिवसभरातून ५०० रुपये मिळते. सध्या बाजारपेठेत आवक ५० टक्क्यावर आल्यामुळे ५० ते १०० रुपयांपर्यंतही राेजंदारी निघणे मुश्कील झाले आहे.
रोजंदारीत मोठी घट
^सध्या बाजारपेठेमध्ये फक्त लिंबोळीची आवक होत आहे. मात्र, हमालांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तुलनेत हे काम हे खूप कमी ठरत आहे. पाऊस पडल्यानंतर परिस्थिती सुधारू शकते.''-प्रकाश नलावडे, हमाल, कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना
यावर्षी आवक घटली
गतवर्षीपेक्षा ५० टक्क्याने मालाची आवक घटली आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रात जाणवू लागला आहे. बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या हमाल, मापाडीसारख्या कामगारांनाही याचा फटका बसत आहे. पाऊस आल्यास बाजारपेठ सुरळीत होईल. ''
गणेश चौगुले, सचिव, जालना कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना
बाजारपेठेत शुकशुकाट
महिनाभरापासून पाऊस नसल्यामुळे बाजारपेठेत आवक कमी झाली आहे. शिवाय मुख्य बाजारपेठेतही रोजगार मिळत नाही. सध्या कामगारांसमोर रोजगाराचा प्रश्न आहे. ''
गजानन निकाळजे, हमाल, कृउबास, जालना
बातम्या आणखी आहेत...