आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच महिन्यांत पाटबंधारे विभागाकडून कार्यवाही नाही, वायसर कुचकामी; ‘मांजरा’च्या दरवाजातून पाच दलघमी विसर्ग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई/ कळंब : केज, धारूर, अंबाजोगाई लातूर व कळंब शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या केज तालुक्यातील मांजरा धरणाच्या अठरा दरवाजांपैकी चार दरवाजांचे रबर वायसर खराब झाल्याने अडीच महिन्यांपासून धरणातून पाण्याची गळती सुरू झाली आहे. तीन वर्षांपासून कोरड्या पडलेल्या धरणात यंदा परतीच्या पावसामुळे मुबलक जलसाठा झाला असला तरी गळतीमुळे आतापर्यंत सात टक्के साठा घटला आहे.
मराठवाड्यात सलग चार वर्षे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे मांजरा प्रकल्प कोरडा पडला होता. परिणामी प्रकल्पावर आधारित पाणी पुरवठा योजना बंद पडल्या होत्या. लातूर शहराला तर इतिहासामध्ये पहिल्यांदाच रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला. धरण कोरडे पडल्यामुळे कळंब शहरासह इतर शहरांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. यावर्षीही पावसाळ्याच्या सुरुवातीला सरासरीपेक्षा कमीच पावसाचे प्रमाण होते.

परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने मांजरा प्रकल्पासह इतर लहान मोठे साठवण तलाव भरले. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरासह परिसरातील खेडे तसेच बीड, लातूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण सहा वर्षांनंतर पहिल्यांदा भरले. क्षमतेपेक्षा जास्त पाणी आल्यामुळे तीन वेळा दरवाजे उघडावे लागले होते. धरण भरल्यामुळे तीन जिल्ह्यांतील काही शहरे व गावांचा पाणी प्रश्न मिटला, तर हजारो हेक्टरवरील शेतीला फायदा झाला.

मांजरा प्रकल्पाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
मांजरा प्रकल्पात ६४२ क्युबिक मीटर पाणी होते. सध्या ६११ क्युबिक मीटर पाणी साठा आहे. दरवाजे खराब झाल्याने आतापर्यंत पाच दलघमी पाणी वाया गेले. असे असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शक्कल लढवल्याची शक्यता
अडीच महिन्यापासून दरवाजाचे रबरी वायसर खराब झाले असून पाणी वाया जात असल्याचे कारण संबंधित अधिकारी सांगत आहेत. या पट्ट्यात मोठे शेतकरी असून त्यांच्या सोयीसाठी दरवाजाचे रबर बसवण्यात येत नसल्याची शक्यता असल्याचे काही शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात येते.

धरणात पुन्हा पाणी सोडणारे मोटारपंप बंद
मांजरा प्रकल्पातून पाणी सोडणाऱ्या दरवाजामधून पाण्याची गळती होत आहे. हे पाणी वाहून जाऊ नये म्हणून एक बोगदा तयार करून मोटारपंपाद्वारे पुन्हा पाणी धरणात टाकले जाते, परंतु हे पंप २००७ पासून बंद आहेत. यामुळे पाणी वाहून जात आहे. प्रशासनाने पंपाच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले नसल्याचे दिसून येते.

गळतीमुळे ५ दलघमी पाणी नदीतून वाहतेय
मांजरा धरण बनवल्यापासून ३५ वर्षांमध्ये फक्त ७ वेळा पूर्णक्षमतेने धरणे भरले अाहेत. यावर्षी पाण्याचा फ्लो वाढल्याने तीन वेळा दरवाजे उघडावे लागले. सध्या गळतीमुळे पाच दलघमी पाणी नदी पात्रातून वाहत आहे. यामुळे आतापर्यंत धरण सात टक्के रिकामे झाले आहे. अशीच स्थिती कायम राहिली तर पाणीसाठा झपाट्याने घटण्यास वेळ लागणार नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे.
वीज कपातीमुळे पाणी लिफ्टिंगला अडचणी, सहा तासच मिळतेय वीज
धनेगाव येथील मांजरा धरणावर सध्या महावितरणकडून वीज सहा तासच मिळत असल्यामुळे निरीक्षण टँकमधील पाणी उपसा करून धरणामध्ये टाकू शकत नाहीत. त्यामुळे सहा तासांत जेवढे पाणी धरणात टाकता येईल. तेवढे पाणी टाकण्याचा प्रयत्ना करत आहोत. उर्वरित वेळेतील पाणी नदीपात्रात सोडत असल्याचे मांजरा धरणाच्या कर्मचाऱ्याने सांगितले.

पाणीटंचाईची शक्यता
- भीषण दुष्काळामुळे नागरिकांना पाण्याचे महत्त्व कळले. मात्र, उपलब्ध पाणी जतन करून ठेवण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पाणी विसर्ग करणाऱ्या दरवाजाचे रबर खराब झाल्याने पाणी वाया जात आहे. यामुळे भविष्यकाळात पाणीटंचाईची शक्यता आहे.
- सुमीत बलदोटा, नागरिक.
वरिष्ठांना कळवले; सूचना नाहीत
- मांजरा धरणाच्या ४ दरवाजाचे रबरी वायसर खराब झाले. त्यातून पाण्याची गळती सुरू झाली आहे. तसेच धरणालगत असणाऱ्या एअरभिंतीतूनही पाण्याची गळती सुरू झाली आहे. या दोन्हींची दुरुस्ती करण्याच्या मागणीचे पत्र २४ सप्टेंबर रोजी वरिष्ठ कार्यालयाला पाठविले आहे. अद्याप याप्रकरणी वरिष्ठांकडून सूचना आलेल्या नाहीत.
-अनिल मुळे, अभियंता, मांजरा धरण.

धरणाच्या भिंतींतूनही गळती सुरू, अधिकाऱ्यांवर कारवाई करा
- मांजरा धरणाच्या दरवाजातून व भिंतीमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरू आहे. पावसाळ्यापूर्वीच दरवाजे व इतर दुरुस्ती करणे आवश्यक होते, परंतु ते पाटबंधारे विभागाने केले नाही. ती थांबवणे गरजेचे आहे.
-नंदकिशोर मुंदडा, सामाजिक कार्यकर्ते, अंबाजोगाई.
बातम्या आणखी आहेत...