परभणी - शाळा सुटल्यानंतर सायकलवर घरी परतणाऱ्या दोन सख्ख्या भावांवर नियतीने डाव साधला. कंटेनरने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत या दोन भावांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जिंतूर शहरापासून जवळच एक किलोमीटर अंतरावर सोमवारी दुपारी दोन वाजता घडली.
जिंतूरपासून पाच किलोमीटरवर असलेल्या माथला येथील मनेश सखाराम राऊत (१०) हा पाचवीत तर दिनेश राऊत (१५) हा नववीच्या वर्गात जिंतुरातील जवाहर विद्यालयात शिकत आहेत. हे दोघेही भाऊ दररोज सायकलने जे-जा करीत असत. श्रावणी सोमवारनिमित्त शाळा अर्धवेळ असल्याने दुपारी दोनच्या सुमारास ते दोघे माथला येथे सायकलवरून घरी जात होते. ते औंढा टी पॉइंटवर मागून येणाऱ्या १८ टायरच्या मालवाहू कंटेनरने ( एम.एच.०६-एक्यू-८२००) सायकलला जोरदार धडक दिली. यात दोघांच्याही डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.