आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन बसची समोरासमोर धडक; 11 प्रवासी जखमी, दोघे गंभीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- खराब रस्ता चुकवण्याच्या प्रयत्नात एसटी महामंडळाच्या बसने समोरून येणार्‍या बसला जोराची धडक दिली. या अपघातात 11 प्रवासी जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात लातूरजवळ विद्यापीठ उपकेंद्रासमोर गुरुवारी सकाळी झाला. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कळमनुरी आगाराची सोलापूर-कळमनुरी बस (एमएच 20 बीएल 1109) लातूरकडे येत होती. सकाळी साडेसात वाजता ती पेठ या गावाजवळ आली. त्या वेळी लातूरहून सोलापूरकडे जाणारी औसा आगाराची बस (एमएच 14 बीटी 1434) वेगाने जात होती. रस्ता खराब असल्याने या बसच्या चालकाने तो चुकवण्यासाठी एकदिशा मार्गाने गाडी दामटली. त्याच वेळी कळमनुरीच्या चालकाने साइड देण्यासाठी लाइट लावून इशारा दिला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले व दोन्ही गाड्या एकमेकींवर जोरात आदळल्या. ही धडक एवढी जोरात होती की, दोन्ही गाड्यांचा पत्रा चेपला. मोठा आवाज झाल्यामुळे पेठ गावातील नागरिक अपघातस्थळाकडे धावले. बसच्या काचा फुटल्या तसेच सीटचे लोखंडी पाइप वाकडे झाल्याने दोन प्रवासी त्यात अडकले. एकच गोंधळ उडाला. धक्क्याने लोखंडी गजावर आदळल्याने अनेक प्रवाशांचे दात तुटले व नाके फुटली. एका प्रवाशाची जीभ तुटली. डोक्याला मार लागला. कळमनुरी गाडीचे चालक आनंदा रामचंद्र सांगळे यांचा पाय फ्रॅक्चर झाला व डोक्यासही मार लागला. तुळजापूरहून लातूरला येणार्‍या प्रणिता अंबादास देशमाने यांना गंभीर मार लागल्याने लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील मार्डीचे रहिवासी नीळकंठ उदगीरकर यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. अति रक्तस्रावाने ते बेशुद्ध झाले असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे लातूर शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे डॉ. सदाशिव धनवे यांनी सांगितले.
दरम्यान, लातूरचे विभाग नियंत्रक डी. टी. माने, आगारप्रमुख युवराज थडकर यांनी रुग्णालयास भेट देऊन जखमींची चौकशी केली. लातूर-सोलापूर गाडीचे चालक शिवानंद उटगे यांच्यावर औसा येथे उपचार सुरू असून प्रथमदर्शनी त्यांचीच चूक असल्याचे प्रवाशांनी सांगितले. कामावर रुजू झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागीय वाहतूक अधीक्षक एस. टी. मोतीबने यांनी सांगितले.

जखमींची नावे
सिद्राम गुडे (परळी), परमेश्वर संभाजी फड (हवतगाव, ता. गंगाखेड), मुरलीधर आनंद शिंदे (औसा), बेबी प्रताप जाधव (बामणी, जि. हिंगोली), प्रशांत अंबादास देशमाने (तुळजापूर), प्रणिता प्रशांत देशमाने (तुळजापूर), अंबादास छगनराव देशमाने (तुळजापूर), रूपेश गुरुबसप्पा पावले, आनंद रामचंद्र सारोळे (कळमनुरी), शिवानंद उटगे (औसा), नीळकंठ उदगीरकर (मार्डी, जि. उस्मानाबाद)

पेठच्या ग्रामस्थांची मदत
जखमींच्या मदतीसाठी पेठ येथील ग्रामस्थांचे प्रसंगावधान व मदत कामी आली. प्रवाशांची आरडाओरड ऐकून पेठ येथील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळ गाठून सर्व प्रवाशांना बसबाहेर काढले. त्या मार्गावरून जाणार्‍या एसटीला थांबवत त्यातून जखमींना लातूर येथे हलवले. र्शीमंत चव्हाण, रमेश पाटील, धनराज कांबळे, गोपाळ पाडोळे, बाबासाहेब मातवे, लक्ष्मण पवार, अशोक गवळी यांचे सहकार्य मोलाचे ठरले.