आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणची वीज कोसळून दोघांचा मृत्यू, जालना जिल्ह्यातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडीगोद्री| अंबड - आकाशातली वीज कोसळत नसली तरी महावितरणची वीज मात्र मोठे संकट घेऊन कोसळत आहे. जळालेले रोहित्र उतरवण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय युवकाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना अंबड तालुक्यातील नालेवाडी गावात मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली. मुस्तकीन मेहबूब शेख असे मृताचे नाव आहे. मृत्यूस जबाबदार अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी वडीगोद्री ३३ केव्ही केंद्रात मृतदेह आणला. कार्यालयाची तोडफोड करून औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर २ तास रास्ता रोको केला. पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, हस्तपोखरी येथेसुद्धा विजेची तार तुटल्याने शॉक लागून कांता ज्ञानदेव गाढे या महिलेचा मृत्यू झाला.

नालेवाडी येथील ८ दिवसांपासून जळालेली डीपी दुरूस्तीसाठी मुस्तकीन हा सकाळी वायरमन राजू इंडोलेसोबत गेला हाेता. वायरमन राजू हे खाली थांबले, तर मुस्तकीनला डीपीवर पाठवले. तेवढ्यात तारेमध्ये विद्युत प्रवाह आल्यामुळे शॉक लागून मुस्तकीन जमिनीवर कोसळला. यावेळी ग्रामस्थांनी मुस्तकीनला ताबडतोब खासगी गाडीत टाकून औरंगाबादला नेण्याचा प्रयत्न केला. पाचोड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी मृतदेह वडीगोद्री येथील ३३ केव्ही केंद्रात आणला. तसेच या मृत्यूस जबाबदार कनिष्ठ अभियंता, ऑपरेटर, वायरमन यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होईपर्यंत मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.
दरम्यान, युनूस शेख यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गोंदी ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

३ लाखांची मदत देणार
नालेवाडी येथील घटनेत राजू इंडोले जबाबदार असून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यात दोषी आढळणाऱ्या कनिष्ठ अभियंता किंवा ऑपरेटरवरसुद्धा कारवाई करण्यात येईल. तसेच मृत मुस्तकीन शेख याच्या कुटुंबीयास तीन लाखांची मदतही दिली जाईल.

आठवडाभरापूर्वीची घटना ताजी
अंबड तालुक्यातील भांबेरी येथे आठवडाभरापूर्वीच योगेश कांताराव कनके (३५) या युवकाचा विजेचा धक्का लागल्यामुळे भाजला होता. तरीसुद्धा वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले नाही व मंगळवारी एका युवकाचा बळी गेला.
बातम्या आणखी आहेत...