आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्‍काळाच्या झळा: जालन्यात दोन शेतक-यांनी विष घेऊन केली आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - जिल्ह्यातील दोन शेतक-यांनी आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. श्रीमंता कुंडलिक गावंडे (५०, रा. टाकळी दाऊतपूर, ता. भोकरदन) आणि नामदेव सुखदेव जगताप (३५, निवडुंगा, ता. जाफराबाद) अशी मृत शेतक-यांची नावे आहेत. जगताप या तरुण शेतक-याने विष प्राशान करून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. गावंडे यांनी दुष्काळी परिस्थिती, सततची नापिकी यामुळे १७ डिसेंबर रोजी विष पिऊन आत्महत्या केली.
कर्जाच्या धास्तीने लातुरात शेतक-याची आत्महत्या
लातूर / जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून कर्जाच्या धास्तीने लातूर तालुक्यातील भिसेवाघोली येथील एका शेतक-याने गळफास घेऊन गुरुवारी मरणाला कवटाळले. जयद्रथ ज्ञानोबा भिसे (४५) असे मृताचे नाव असून या वर्षातील जिल्ह्यातील ही ४० वी शेतकरी आत्महत्या ठरली आहे. याप्रकरणी मुरूड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. जयद्रथ व त्यांच्या अन्य दोन भावांना साडेपाच एकर जमीन आहे. त्यातील जयद्रथ यांच्या वाट्याला दीड एकरची नोंद आहे.

शेतकरी महिलेची आत्महत्या
नांदेड। शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या चिखली गावात नापिकीला कंटाळून शेतकरी महिलेने आत्महत्या केली. सुमनबाई गोविंदराव कोल्हे (५५) असे या महिलेचे नाव आहे. सुमनबाई मुलासोबत राहत होत्या. त्यांना ५ एकर शेती असून या शेतीवरच कुटुंबाचा गाडा चालत होता. यंदा शेतीच्या लागवडीसाठी त्यांनी कर्ज घेतले. परंतु पावसाअभावी दोन्ही हंगामाची पिके गेली. त्यामुळे हताश होऊन रात्री त्यांनी औषधी गोळ्यांचे सेवन केले. सकाळी ६ वाजेच्या सुमाराला त्या घरात मृतावस्थेत आढळल्या.