आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूर-मुंबई गाडी नांदेड येथून सुरू करावी या मागणीसाठी देवगिरी एक्स्प्रेस दोन तास रोखली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - लातूर-मुंबई गाडी नांदेड येथून सुरू करावी, या मागणीसाठी रविवारी सकाळी देवगिरी एक्स्प्रेस दोन तास अडवून ठेवण्यात आली. रेल्वे महाव्यवस्थापकांनी दिलेल्या तोंडी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले; परंतु लातूर-मुंबई गाडी नांदेडहून सुरू करू, असे लेखी आश्वासन देण्यास रेल्वे प्रशासनाने नकार दिला.


देवगिरी एक्स्प्रेस रविवारी सकाळी नियोजित (8.40) वेळेपेक्षा उशिरा आली. सकाळी 9.35 वाजता देवगिरी एक्स्प्रेसचे प्लॅटफॉर्म क्रमांंक 4 वर आगमन झाल्यानंतर संघर्ष समितीचे सचिव सुधाकरराव डोईफोडे यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी गाडीच्या इंजिनवर चढाई केली. काही कार्यकर्त्यांनी रेल्वे रुळावर ठाण मांडले. जवळपास 1500 च्या संख्येने असलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत रेल्वे अडवून ठेवली. खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार ओमप्रकाश पोकर्णा, महापौर अब्दुल सत्तार, शोभाताई वाघमारे, जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, रिपाइं, एमआयएम, व्यापारी महासंघ, मराठा महासंघ, ब्राह्मण महासंघ, वृत्तपत्र विक्रेता संघटना, विद्यार्थी संघटना, स्वातंत्र्यसैनिक संघटना, आम आदमी पार्टी आदी सर्व संघटनांचे सदस्य या आंदोलनात सहभागी झाले.


11 वाजेच्या सुमाराला अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पी. बी. निनावे हे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांचा निरोप घेऊन आंदोलनस्थळी आले. लातूर-मुंबई ही गाडी बजेटमध्ये जाहीर झालेली असल्याने ही गाडी नांदेडहून सुरू करण्यास आम्ही वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनीही मोबाइलवरून आमदार पोकर्णा यांच्याशी बोलताना हे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर देवगिरी एक्स्प्रेस जाऊ द्यावी, असे जाहीर करण्यात आले. आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनीही रेल्वे रुळावरून बाजूला होऊन गाडीचा मार्ग मोकळा केला.


सव्वाअकरा वाजता गाडी पुढच्या प्रवासाला निघाली. जवळपास 100 फूट गाडी पुढे आल्यानंतर खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी तोंडी आश्वासन कामाचे नाही. हे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आहे. रेल्वे प्रशासन जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत गाडी जाऊ दिली जाणार नाही, असे जाहीर केल्याने सिग्नलसमोर आलेली गाडी कार्यकर्त्यांनी पुन्हा अडवली.


आश्वासनास नकार
रेल्वे प्रशासनाने लेखी आश्वासन देण्यास नकार दिला. त्यामुळे पुन्हा अर्धा तास गाडी खोळंबली. अखेर लेखी आश्वासन मिळाले नसतानाही महाव्यवस्थापकाच्या तोंडी आश्वासनावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेत असल्याचे सुधाकरराव डोईफोडे यांनी जाहीर केले.


21 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा
9.35 ते 11.45 यादरम्यान रेल्वे आंदोलकांनी देवगिरी एक्स्प्रेस रोखली. याप्रकरणी आंदोलनकर्त्या 21 कार्यकर्त्यांविरुद्ध रेल्वे अधिनियम कायद्याच्या कलम 174 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यात दोन महिलांचाही समावेश आहे.