आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Hundred Acre Farmland Grabbed, Kandhar Money Lendors Crime

दोनशे एकर शेतजमीन हडपली; कंधारच्या सावकाराचा प्रताप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - लोहा तालुक्यातील निळा व किरोडा गावातल्या 29 शेतक-यांना अवैध सावकारीच्या पाशात अडकवून त्यांची 200 एकर जमीन हडप करणा-या 13 सावकारांविरुद्ध लोहा पोलिस ठाण्यात रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व सावकार एकाच कुटुंबातील असून ते कंधारचे रहिवासी आहेत.
कंधार येथे राहणारे वसंत भागवत पापीनवार (60) हे गेल्या 40 वर्षांपासून सावकारीचा व्यवसाय करतात. त्यांच्याजवळ सावकारी करण्याचा परवाना नाही. तथापि गरजवंत शेतक-यांना दरसाल दरशेकडा 3 ते 5 टक्के दराने कर्ज देण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. त्या मोबदल्यात शेतक-याची जमीन गहाण ठेवून त्याची कागदपत्रे ते स्वत:जवळ ठेवतात. लोहा तालुक्यातील निळा व किरोडा गावातील 29 शेतक-यांनी जवळपास 3-4 वर्षांपूर्वी त्यांच्याकडून कर्ज घेतले. या कर्जाची रक्कम व्याजासह परत करण्यासाठी शेतकरी गेले असता तुमची जमीन विकत घेतली आहे. त्यामुळे ती परत करणार नाही, असे वसंत पापीनवार यांनी सांगितले. त्यानंतर शेतक-यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
पोलिसांकडे तक्रार : फसवणूक झालेल्या शेतक-यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे तक्रार केली. 13 रोजी शेतक-यांनी लोहा पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी लोहा येथील सहायक निबंधक शिवाजी व्यंकटराव गिणगिणे यांच्याकडे या तक्रारीची शहानिशा करण्यास सांगितले. सहायक निबंधकांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून शेतक-यांकडे असलेली कागदपत्रे तपासली. त्या वेळी वसंत पापीनवार यांनी अवैध सावकारीचा व्यवसाय केल्याचे त्यांच्या लक्षात आले. या संबंधात सावकार व शेतकरी यांना आपापली बाजू मांडण्यासाठी 16 रोजी सहायक निबंधकांनी लोहा येथे सुनावणी ठेवली. या सुनावणीत शेतक-यांनी कागदपत्रे सादर करून आपली बाजू मांडली, परंतु पापीनवार यांनी सुनावणीला हजेरी लावली नाही.
अशी केली फसवणूक : लोहा तालुक्यातील अनेक शेतक-यांनी पेरणी, मुलीचे लग्न, मुलाच्या शिक्षणासाठी सावकाराकडून कर्ज घेतले. वसंत पापीनवार यांनी शेतक-यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन कर्ज घेताना त्यांच्याकडून गहाणखताऐवजी बेनामीच (खरेदी खत) लिहून घेतले. त्यानंतर ती जमीन आपल्याच कुटुंबातील भाऊ, मेहुणे, जावई यांच्या नावावर केली.शेतकरी जेव्हा व्याजासह कर्जाची रक्कम परत करण्यास आले तेव्हा पापीनवार यांनी जमीन खरेदी केल्याचे सांगितले.
चार जणांना अटक : सहायक निबंधक गिणगिणे यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी केल्यानंतर रविवारी लोहा पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून लोहा पोलिस ठाण्यात मुंबई सावकारी अधिनियम 1946 च्या कलम 5-32 (ब) व 33 तसेच भादंविच्या 420,34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी या प्रकरणातील मुख्य आरोपी वसंत भागवत पापीनवार, विश्वेश्वर भागवत पापीनवार, ज्ञानेश्वर पापीनवार (सर्वजण भाऊ आहेत.) व गोविंद रहाटकर यांना रविवारी अटक करण्यात आली. गोविंद रहाटकर हे पापीनवार यांचे जावई आहेत. याप्रकरणी एकूण 14 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गृहमंत्र्यांकडून दखल
याप्रकरणी शेतक-यांच्या तक्रारी आल्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नांदेडच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांना फॅक्स करून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. गृहमंत्र्यांचे आदेश आल्यानंतर तातडीने पोलिसांनी
पावले उचलली.
गुन्ह्यातील आरोपी
वसंत भागवत पापीनवार, ज्ञानेश्वर भागवत पापीनवार, विश्वेश्वर भागवत पापीनवार, गोविंद रहाटकर (सर्व अटक), शिल्पा गोविंद रहाटकर, रिचा पापीनवार, अंजली पापीनवार, विनायक पापीनवार, अतुल पापीनवार, अमोल पापीनवार, विशाल पापीनवार, भागवत पापीनवार (मृत), अरुणाबाई पापीनवार.
चौकशीत अनेक बाबी समोर येतील
या प्रकरणाची सध्या जी चौकशी केली त्यात 29 शेतक-यांची फसगत झाल्याचे आढळून आले. वसंत पापीनवार हे या प्रकरणातील प्रमुख आरोपी असून त्यांनी शेतक-यांच्या जमिनी आपल्याच नातेवाइकांच्या नावाने केल्या आहेत. यात त्यांच्या कुटुंबातील महिलांचाही समावेश आहे. 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक आरोपी मृत आहे.
अशोक तानाजी वीरकर, पोलिस उपअधीक्षक, कंधार