आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोनशे हेक्टर जमीन ड्रायपोर्टसाठी उपलब्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना/बदनापूर - मराठवाड्यातील प्रस्तावित ड्रायपोर्टसाठी जालना तालुक्यातील दरेगाव व बदनापूर तालुक्यात जवसगाव शिवारात काही तांत्रिक बाबी वगळता २०९ हेक्टर ७८ आर जमीन उपलब्ध आहे. या आशयाचा अंतिम अहवाल येत्या २ दिवसांत शासनाला कळवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ड्रायपोर्टसाठी साधारणत: २०० हेक्टर जमिनीची गरज आहे. यानुसार जमीन उपलब्धतेचा प्राथमिक अहवाल यापूर्वीच शासनास पाठवलेला आहे. दरम्यान, जेएनपीटीच्या (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) मुख्य प्रबंधक व समिती सदस्यांनी गेल्या महिन्यात ७ नोव्हेंबरला तर (९ डिसेंबर) मंगळवारी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनीही दरेगाव शिवारात जागेची पाहणी केली. या अनुषंगाने बुधवारी जालना व बदनापूर तालुक्यांतील अनुक्रमे दरेगाव व जवसगाव येथील उपलब्ध जमिनीचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू होते. अर्थात, प्रशासकीय पातळीवर या कामाला गती आली आहे.

दरेगावात १२७ हे. ८२ आर जमीन जालना तालुक्यात दरेगाव शिवारात गट नं. ३१८, २६८, २१२, ९, ५, १ मध्ये एकूण १६२ हेक्टर ३३ आर शासकीय गायरान जमीन आहे. यापैकी ३४ हे. ५१ आर जमीन वाटप झालेली आहे. यात भूमिहीन वाटप, संपादित पाझर तलाव, स्मशानभूमी, कोरडोमल नाका, शासकीय घरकुल व खळवाडी आहे.

उर्वरित १२७ हेक्टर ८२ आर जमीन शिल्लक आहे. मात्र, यापैकी गट नं. ३१८ मध्ये अंदाजे ३० हे., तर गट नं. २६८ मधील १५ हे. ८६ आर जमिनीवर अनधिकृत अतिक्रमण झालेले आहे. याचा अहवाल १० नोव्हेंबरला तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयास
पाठवलेला आहे.

...तर अतिक्रमण
हटवावे लागेल
दरेगाव शिवारात ४५ हे. ८६ आर शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. दरम्यान, ड्रायपोर्टला अंतिम मंजुरी मिळाल्यास हे अतिक्रमण काढावे लागेल.

जवसगावात ८१ हेक्टर जमीन
गट नं. ८, १४६ व २५ मध्ये एकूण १०५ हेक्टर ११ आर एवढी गायरान जमीन आहे. यातील गट नं. ८ हा गावाला लागूनच असून येथे फक्त २ हे.५७ आर जमीन आहे. गट नं. १४६ हा सेलगाव शिवारास लागून असून येथे ३८ हे. ९९ आर जमीन आहे. यापैकी १० आर हिंदू, तर ५ आर जमीन मेंढगी जोशी समाजाच्या स्मशानभूमीसाठी दिलेली आहे. अर्थात, या गटात ३८ हे. ८४ आर जमीन उपलब्ध आहे. गट नं. २५ मध्ये २० हे. ४३ आर जमीन वाटप केलेली असून ४३ हे. १२ आर जमीन शिल्लक आहे. याचा अहवाल बुधवारी बदनापूर तहसील कार्यालयाकडून जालना उपविभागीय अधिकारी मंजूषा मुथा यांना देण्यात आला आहे.

दरेगावात तांत्रिक अडचणी
दरेगाव शिवारातील गट नं. ३१८, २६८, २१२, ९, ५, १ मधील एकूण सरकारी जमिनीच्या १६२ हेक्टर ३३ आर जमिनीपैकी वाटप झालेले क्षेत्र वजा जाता १२७ हे. ८२ आर जमीन शिल्लक राहते, परंतु गावाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ५ टक्के (८३ हे. २१ आर) वजा जाता दरेगाव येथे ४४ हे. ६१ आर क्षेत्र शिल्लक राहते, परंतु या क्षेत्रापैकी अंदाजे ३० हे. क्षेत्रावर अतिक्रमण झालेले आहे. १४ हे. ६१ आर एवढी जमीन अतिक्रमणविरहित असल्यामुळे प्रस्तावित १४ हे. ६१ आर जमीन उपलब्ध होत आहे. सदर जमीन अन्य कोणत्याही प्रयोजनार्थ यापूर्वी प्रस्तावित आरक्षित/संपादित करण्यात आलेली नाही. यामुळे १४ हे. ६१ आर जमीन निर्विवाद उपलब्ध आहे, असा अहवाल जालना तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवलेला आहे.