आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Kill In Jeep And Two Wheeler Accident On Beed Gevrai Highway

काळीपिवळी जीपच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई - गढी येथील देवीच्या मंदिरापासून गावात जाणाऱ्या दुचाकीस बीडहून गेवराईकडे जाणाऱ्या काळ्यापिवळ्या जीपने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दोन तरुण ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता गढी येथील पेट्रोल पंपाजवळ घडला. गणेश यादवराव गायकवाड (२५ ) व नामदेव देविदास कटक (२०, रा.गढी कारखाना) अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत.

गेवराई तालुक्यातील गढी कारखाना येथील गणेश गायकवाड व नामदेव कटक हे दोघे तरुण शुक्रवारी सकाळी गढी येथील जयभवानी देवीच्या मंदिरापासून दुचाकीने (एमएच २८ एएफ ६९७४) गढी गावात जात होते. याच वेळी गेवराई- बीड या राष्ट्रीय महामार्गावरून बीडहून गेवराईकडे काळीपिवळी (एमएच २३ सी १०४२) भरधाव निघाली होती. दोन्ही वाहनांची गढीजवळील पेट्रोल पंपाजवळ समोरासमोर जोराची धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघातात मोटारसायकल चक्काचूर झाली. अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने धुळे - सोलापूर या गेवराईतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

काळ्यापिवळ्या जीपची तोडफोड
गढी येथील पेट्रोल पंपाजवळ अपघात झाल्यानंतर अपघातात मृत झालेल्या दोन्ही तरुणांच्या मित्रांनी जीपच्या चारही टायरची हवा सोडून काचांची तोडफोड केली. त्यामुळे काही वेळ घटनास्थळी तणाव निर्माण झाल्याने गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

जीपचालक फरार
अपघातात ठार झालेल्या दोन्ही तरुणांच्या मृतदेहांचे गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी संतोष बाबूराव चव्हाण यांनी गेवराई पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून जीपचालक कांबळे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून तो फरार झाला आहे. या अपघाताने गढी गावावर शोककळा पसरली आहे.